China reaction on PM Modi Podcast: अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी झालेल्या संभाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन संबंधांवर भाष्य केले. मोदींनी ज्याप्रकारे चीनचे राजकीय मित्र म्हणून वर्णन केले, त्याने नेहमी आक्रमक आणि संघर्षाची भूमिका घेणारा चीन भारावून गेला आहे. त्यामुळेच, चिनी डिप्लोमॅट आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ते माओ निंग यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी चीन-भारत संबंधांबाबत केलेले भाष्य हे कौतुकास्पद पाऊल, असे माओ यांनी सोमवारी सांगितले.
चिनी प्रवक्ते माओ म्हणाल्या, "गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांची कझाकस्तानमध्ये यशस्वी बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या काळात अनेक मुद्द्यांवर एकमत झाले, जे दोन्ही देशांनी प्रामाणिकपणे अंमलात आणले आहेत. दोन्ही बाजूंनी संवादाद्वारे त्यांचे व्यावहारिक सहकार्य मजबूत केले आहे आणि अनेक सकारात्मक परिणाम साध्य केले आहेत. माओ पुढे म्हणाले की, चीन आणि भारताचे संबंध वर्षानुवर्षे जुने आहेत. मानवी प्रगतीमध्ये आपण महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आम्ही आमच्या जुन्या राजकीय नात्याला चालना देण्यासाठी तयार आहोत."
पॉडकास्टमध्ये मोदी काय म्हणाले?
"सर्व देश एकमेकांकडून काही ना काही शिकत आहेत. आम्हाला भविष्यातही आमचे संबंध मजबूत करायचे आहेत. चीन किंवा कुठल्याही देशाशी मतभेदांचे रूपांतर वादात होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्हाला स्पर्धा हवी आहे, पण संघर्ष नकोय. २०२० मध्ये सीमेवर जी परिस्थिती उद्भवली ती पूर्ववत करण्यासाठी आम्ही दोनही देश काम करत आहोत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या अलिकडच्या भेटीनंतर, सीमेवर परिस्थिती सामान्य झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे. निश्चितच आता दोन देशांमधील नाते अधिक दृढ होईल," असा विश्वास मोदींनी व्यक्त केला होता.