बीजिंग: चीनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुन्हा एकदा गदा आल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात वुहानमधील परिस्थितीचे धाडसी रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकार झांग झान यांना चार वर्षांनंतर पुन्हा एकदा तुरुंगात टाकण्यात आले आहे. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (RSF) या आंतरराष्ट्रीय संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झांग झान यांनी २०२० मध्ये वुहान शहरात जाऊन कोरोना विषाणूच्या प्रसाराची खरी परिस्थिती लोकांसमोर आणली होती. त्यांनी फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून सरकारी दाव्यांपेक्षा वेगळे चित्र जगाला दाखवले. यामुळे संतप्त झालेल्या चीन सरकारने त्यांना "वाद निर्माण करणे आणि अडचणी निर्माण करणे" (Picking Quarrels and Provoking Trouble) या आरोपाखाली चार वर्षांची शिक्षा सुनावली होती.
झांग झान मे २०२४ मध्ये तुरुंगातून बाहेर आल्या होत्या. मात्र, अवघ्या तीन महिन्यांतच त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि शंघाईच्या पुडोंग येथील तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांच्यावर पुन्हा एकदा याच आरोपाखाली कारवाई करण्यात आली आहे.
चीनमध्ये पत्रकारांची अवस्था वाईट:
रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (RSF) नुसार, प्रेस फ्रीडम इंडेक्स २०२५ मध्ये १८० देशांच्या यादीत चीन १७८ व्या स्थानावर आहे. ही संस्था चीनला जगातील पत्रकारांसाठी सर्वात मोठा तुरुंग मानते, जिथे सध्या सुमारे १२४ पत्रकार आणि मीडिया कर्मचारी तुरुंगात आहेत.