सीमेवरून दोन्ही सैन्यांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा चीनचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 06:31 AM2020-07-29T06:31:46+5:302020-07-29T06:32:07+5:30

भारताला हवे कमांडरांच्या बैठकीत झालेल्या समझोत्याचे पालन

China claims to have completed the withdrawal of both troops from the border | सीमेवरून दोन्ही सैन्यांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा चीनचा दावा

सीमेवरून दोन्ही सैन्यांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा चीनचा दावा

Next

बीजिंग/नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवर अलीकडेच वाद व संघर्ष झालेल्या बहुतांश ठिकाणी भारत व चीनने आपापल्या सैन्याची माघार पूर्ण केल्याचा दावा चीनने केला असून जे काही वादाचे मुद्दे शिल्लक आहेत ते सोडविण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडरांच्या पुढील बैठकीची आपण तयारी करीत आहोत, असे म्हटले आहे.


भारताला मात्र चीनचा हा दावा मान्य नसून सैन्य माघारीच्या बाबतीत लष्करी कमांडरांच्या बैठकीत झालेल्या समझोत्याचे चीनने प्रामाणिकपणे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांच्या बैठकीनंतर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयानेही दोन्ही बाजूंनी प्रामाणिकपणे सैन्य माघारी घेण्यावर भर दिला होता. त्याच दिवशी चीनने बीजिंगमध्ये काढलेल्या निवेदनात सैन्य माघारी घेऊन सीमेवरील तणाव कमी करण्याच्या बाबतीत दोन्ही बाजूंकडून सकारात्मक प्रगती झाल्याचे म्हटले होते.


या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांना असा स्पष्ट प्रश्न विचारण्यात आला की, गलवान खोरे, हॉटस्प्रिंग व गोगरा या सर्व भागांतून दोन्ही देशांनी सीमेवरील आपापले सैन्य पूर्णपणे मागे घेतले आहे का? यावर वेनबिन यांनी दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांत लष्करी व राजनैतिक पातळीवर झालेल्या अनेक बैठकांचा संदर्भ देत सांगितले की, बहुतांश ठिकाणी दोन्ही सैन्यांची माघार पूर्ण झाली असून त्यामुळे सीमेवरील तणाव कमी व्हायला मदत झाली आहे.


पूर्णपणे माघार घेण्याचा आग्रह
दोन्ही देशांमधील सीमाविषयक वादांवर चर्चा व समन्वयाच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या कायमस्वरूपी व्यवस्थेच्या अंतर्गत भारत व चीनच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली होती.
सूत्रांनुसार, आधीच्या चर्चा व बैठकींमध्ये ठरल्यानुसार चीनने सर्व वादग्रस्त ठिकाणांहून आपले सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याचा आग्रह या बैठकीत भारताने धरला.

Web Title: China claims to have completed the withdrawal of both troops from the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.