इराणवर केलेल्या भीषण लष्करी कारवाईनंतर आता अमेरिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. "इराणवर हल्ला नेमका का केला?" या एका प्रश्नावरून ट्रम्प सरकारची कोंडी झाली असून, सरकारमधील विसंगती चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे, खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या हल्ल्याची वेगवेगळी कारणे सांगितल्याने अमेरिकन माध्यमांनी सरकारला धारेवर धरले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
ट्रम्प यांचा स्वबचावाचा दावा
ओव्हल ऑफिसमध्ये जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी चर्चा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचे समर्थन केले. ट्रम्प यांच्या मते, इराण अमेरिकेवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होता आणि त्याचा सुगावा लागताच त्यांनी 'प्रिव्हेंटिव्ह स्ट्राईक'चे आदेश दिले. "जर आम्ही आधी हल्ला केला नसता, तर इराणने आमच्यावर हल्ला केला असता," असे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले. मात्र, याच विधानाने त्यांच्याच प्रशासनातील मंत्र्यांच्या दाव्याला छेद दिला आहे.
परराष्ट्र मंत्र्यांचा वेगळाच सूर
दुसरीकडे, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एक वेगळाच तर्क मांडला होता. रुबियो यांच्या मते, इस्रायल इराणवर हल्ला करणार होता आणि त्या कारवाईनंतर इराण अमेरिकन तळांना लक्ष्य करेल, अशी भीती होती. त्यामुळे अमेरिकेने खबरदारी म्हणून आधीच इराणवर प्रहार केला. रुबियो यांच्या या विधानामुळे "अमेरिका इस्रायलच्या दबावाखाली काम करत आहे का?" असा प्रश्न उपस्थित झाला असून, विरोधकांनी यावरून सरकारला घेरले आहे.
समर्थकच बनले टीकाकार!
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे केवळ विरोधकच नव्हे, तर त्यांचे कट्टर समर्थकही नाराज झाले आहेत. प्रसिद्ध पॉडकास्टर मॅट वॉल्श यांनी सोशल मीडियावर सवाल केला की, "मार्को रुबियो यांच्या विधानावरून असे वाटतेय की अमेरिका इस्रायलच्या सांगण्यावरून युद्धात उतरली आहे." तर माजी टीव्ही अँकर मेगिन केली यांनीही सरकारला सुनावले की, "अमेरिकन सरकारचे पहिले कर्तव्य आपल्या नागरिकांची सुरक्षा करणे आहे, दुसऱ्या कोणत्याही देशाची लढाई लढणे नाही."
नेमकं प्रकरण काय?
अमेरिकेने इस्रायलच्या मदतीने इराणवर केलेल्या हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई आणि त्यांचे कुटुंब मारले गेले. या घटनेनंतर इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन एअरबेसवर हल्ल्यांचा वर्षाव सुरू केला आहे. एकीकडे इराण बदल्याची भाषा करत असताना, दुसरीकडे अमेरिकन सरकारमधील अंतर्गत विसंवाद जगासमोर आल्याने ट्रम्प सरकारची नाचक्की होत आहे.
Web Summary : Discrepancies in explanations for the Iran strike have embroiled the Trump administration in controversy. Trump cited a preemptive strike, while Rubio suggested it was to protect Israel, sparking criticism and internal discord.
Web Summary : ईरान पर हमले के स्पष्टीकरण में विसंगतियों के कारण ट्रम्प प्रशासन विवादों में घिर गया है। ट्रम्प ने पूर्वव्यापी हमले का हवाला दिया, जबकि रुबियो ने कहा कि यह इजरायल की रक्षा के लिए था, जिससे आलोचना और आंतरिक असहमति हुई।