लोकप्रिय मेसेजिंग अॅप टेलीग्रामचे (Telegram) संस्थापक पावेल डुरोव यांच्याविरोधात रशियाने गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली असून, रशियाची सुरक्षा यंत्रणा फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (FSB) यांनी दिलेल्या माहितीनंतर तपास सुरू करण्यात आला आहे.
सरकारी वृत्तपत्रात माहिती प्रसिद्ध
रशियाचे सरकारी वृत्तपत्र ‘रोस्सिस्काया गजेटा’ने याबाबतची माहिती दिली आहे. वृत्तपत्राच्या अहवालानुसार, पावेल डुरोव यांची भूमिका रशियाच्या फौजदारी संहितेतील कलम 205.1 अंतर्गत तपासली जात आहे. या कलमानुसार दहशतवादी कारवायांना मदत किंवा पाठबळ देणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. या प्रकरणावर डुरोव यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
टेलीग्रामने आरोप फेटाळले
दरम्यान, टेलीग्रामने रशियाच्या आरोपांना जोरदार विरोध केला आहे. टेलीग्राम हे गुन्हेगारी कारवायांचे केंद्र असल्याचे किंवा त्यावर पाश्चिमात्य आणि युक्रेनियन गुप्तचर संस्थांचा प्रभाव असल्याचे आरोप कंपनीने स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. टेलीग्रामचा दावा आहे की, जगभरात त्यांच्या अॅपचे एक अब्जांहून अधिक सक्रिय युजर्स आहेत आणि कंपनी युजर्सची गोपनीयता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
‘कट्टरपंथी कंटेंट’ हटवण्यात अपयशाचा आरोप
रशियाच्या राज्यस्तरीय कम्युनिकेशन रेग्युलेटरने यापूर्वी टेलीग्रामवर काही निर्बंध घातले होते. अधिकाऱ्यांचा आरोप आहे की, टेलीग्राम आपल्या प्लॅटफॉर्मवरील ‘कट्टरपंथी मजकूर’ हटवण्यात अपयशी ठरत आहे. रशियामध्ये टेलीग्राम हे सार्वजनिक तसेच खासगी संवादासाठी अत्यंत लोकप्रिय माध्यम आहे. सामान्य नागरिकांबरोबरच पत्रकार आणि सरकारचे टीकाकार मोठ्या प्रमाणावर या अॅपचा वापर करतात.
सरकारी अॅप ‘MAX’ ला प्रोत्साहन देण्याची तयारी?
दरम्यान, मॉस्को प्रशासन नागरिकांना सरकारी पाठबळ असलेल्या ‘MAX’ या नव्या मेसेजिंग अॅपकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. हे अॅप सुमारे एक वर्षापूर्वीच लाँच करण्यात आले होते. पावेल डुरोव यांच्याविरोधातील ही कारवाई टेलीग्रामवर दबाव वाढवण्याची आणि देशांतर्गत पर्यायाला प्रोत्साहन देण्याची रणनीती असल्याचेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दुबईत वास्तव्य, तिथेच मुख्यालय
पावेल डुरोव सध्या दुबईमध्ये वास्तव्यास असून, टेलीग्रामचे मुख्यालयही दुबईतच आहे. त्यामुळे रशियाच्या या कारवाईचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : Russia filed charges against Telegram's Pavel Durov, accusing him of promoting terrorism. Durov denies the charges, citing commitment to user privacy. Russia pushes local alternative 'MAX'.
Web Summary : रूस ने टेलीग्राम के पावेल ड्यूरोव पर आतंकवाद को बढ़ावा देने का आरोप लगाया है। ड्यूरोव ने आरोपों से इनकार किया, उपयोगकर्ता गोपनीयता के प्रति प्रतिबद्धता जताई। रूस स्थानीय विकल्प 'MAX' को बढ़ावा दे रहा है।