जमियत-उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तानचे प्रमुख मौलाना फजल-उर रहमान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना थेट धमकी दिली आहे. आपले लोक एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा करतील, असे रहमान यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानात अंतर्गत कलह सुरू असतानाच, त्यांचे हे विधान आले आहे.
"पाकिस्तानचे सरकार फार काळ टिकणार नाही" -पाकिस्तानातील बट्टाग्राम येथे एका रॅलीला संबोधित करताना फजल-उर रहमान म्हणाले, "आमच्या लोकांवर अत्याचार होत आहेत, हे योग्य नाही. सरकारला आमच्या ताकदीचा अंदाज नाही. यापूर्वीही आम्ही सरकारला हादरा दिली होता." एवढेच नाही तर, आता पाकिस्तान सरकार फार काळ टिकू शकणार नाही, असा दावाही रहमान यांनी यावेळी केला.
एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील वृत्तानुसार, रहमान म्हणाले, "पाकिस्तानातील विद्यमान सरकार अवैध (बेकायदेशीर) आहे. २०२४ मध्ये येथे फसव्या पद्धतीने निवडणुका झाल्या. सत्तेवर असलेले सर्वजण बनावट आहेत. असे बनावट लोक मला डोळे दाखवू शकत नाहीत. २०१८ मध्येही सार्वत्रिक निवडणुकांनंतर एक बनावट सरकार सत्तेत आले होते, ते आम्ही उखडून टाकले."
"...तर पाकिस्तानात जिहाद सुरू करू" -मौलाना फजल-उर रहमान म्हणाले, "शाहबाज सरकार आमच्या पक्षाला लढाईत ढकलू इच्छित आहे. राष्ट्रीय एकतेच्या मुद्द्यावर आम्ही आघाडीवर आहोत. पण, गरज पडल्यास आम्ही पाकिस्तानात जिहाद सुरू करू." तसेच, शाहबाज शरीफ यांचे सरकार स्वतःला शक्तिशाली समजत आहे. त्यांनी लोकांसमोर झुकायला हवे," असेही रहमान यांनी म्हटले आहे.