कॅन्सरचे निदान आता वेदनारहित, बोन बायोप्सीपासुन होणार सूटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 05:57 PM2018-04-20T17:57:18+5:302018-04-20T18:05:12+5:30

आता केवळ एका प्लास्टिक चिपच्या मदतीने रक्ताची चाचणी करुन कर्करोगाचे निदान करता येणार आहे. वेदना देणाऱ्या बायोप्सीपेक्षा अत्यंत चांगला उपाय रुग्णांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

cancer diagnosis: Chip-based blood test could replace painful bone biopsy | कॅन्सरचे निदान आता वेदनारहित, बोन बायोप्सीपासुन होणार सूटका

कॅन्सरचे निदान आता वेदनारहित, बोन बायोप्सीपासुन होणार सूटका

Next
ठळक मुद्देइंटिग्रेटिव्ह बायोलॉजी या शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधामध्ये यातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. रक्ताची चाचणी एका चिपच्या साहाय्याने करुन बोन बायोप्सीप्रमाणे सर्व निरीक्षणे नोंदवण्याची सोय होणार आहे.  

न्यू यॉर्क- कर्करोगाची शंका आली तरी रुग्ण मनातून खचून जातो. वेदना, त्याच्या तपासण्या व उपचाराचे खर्च आणि विविध परिणाम होणारे उपचार यामुळे ही स्थिती अधिकच वाईट होते. मात्र आता केवळ एका प्लास्टिक चिपच्या मदतीने रक्ताची चाचणी करुन कर्करोगाचे निदान करता येणार आहे. वेदना देणाऱ्या बायोप्सीपेक्षा अत्यंत चांगला उपाय रुग्णांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मल्टिपल मायेलोमा या कर्करोगामध्ये रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मावर परिणाम होतो त्यामुळे रुग्णाला बोन बायोप्सीला सामोरे जावे लागते. या बायोप्सीमध्ये डॉक्टर एक सुई हाडामध्ये खुपसून बोन मॅरोचा नमुना घेतात किंवा कधीकधी हाडाचा थोडा भागही बाजूला काढावा लागतो. ल्युकेमिया सारख्या कर्करोगाच्या अनेक प्रकारांमध्ये बोन बायोप्सी केली जाते.

मात्र आता नव्या शोधामुळे यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी या शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधामध्ये यातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. रक्ताची चाचणी एका चिपच्या साहाय्याने करुन बोन बायोप्सीप्रमाणे सर्व निरीक्षणे नोंदवण्याची सोय होणार आहे.  यामुळे कर्करोग कोणत्या तीव्रतेचा आहे, कोणत्या प्रकारची औषधे रुग्णाला दिली जावीत तसेच पुन्हा रोगाची तीव्रता वाढण्याबाबत तज्ज्ञांना माहिती मिळणार आहे.

कान्सास विद्यापीठामध्ये याबाबत संशोधन करणारे स्टीव्हन सोपर यांनी या चाचणीबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, गेली दहा वर्षे मी रक्ताच्या चाचणीद्वारे विविध कर्करोगांच्या निदान करण्याच्या पद्धतीसाठी संशोधन करत आहे, ल्युकेमिया हा त्यापैकीच एक आहे. बोन मॅरो बायोप्सीला यामुळे टाळता येणार आहे आणि केवळ रक्ताच्या नमुन्याद्वारे ही चाचणी शक्य आहे. नव्या चिपच्या संशोधनामुळे चांगल्याप्रकारे चाचणी करता येते. 

Web Title: cancer diagnosis: Chip-based blood test could replace painful bone biopsy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.