कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यकाळात भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले होते, पण आता दोन्ही देशांतील संबंध सुधारत असल्याचं चित्र दिसत आहे. नुकतीच कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नथाली ड्रोइन आणि उप-परराष्ट्र मंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी दिल्लीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. या भेटीला संबंध सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
डोवाल आणि ड्रोइन यांच्यात सकारात्मक चर्चाया बैठकीत दोन्ही देशांनी सुरक्षा, व्यापार आणि ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत दोन्ही बाजू सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चर्चा करत होत्या. भारताकडून अजित डोवाल यांनी कॅनडात वाढणाऱ्या खालिस्तानी कट्टरवादाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, कॅनडात असलेल्या दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची मागणीही केली. यावर कॅनडाने गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे.
अमित शहा यांच्यावर केलेले आरोपमाजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यकाळात, ड्रोइन आणि मॉरिसन यांनी 'द वॉशिंग्टन पोस्ट' वृत्तपत्राला माहिती दिली होती की, फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्याच्या ऑपरेशनमागे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचा हात होता. या आरोपांना भारताने हास्यास्पद आणि निराधार म्हणत तीव्र आक्षेप घेतला होता. यामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये मोठी कटुता आली होती.
भारत-कॅनडा संबंधातील तणाव सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू झाला, जेव्हा ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर संबंध आणखी बिघडले. पण आता एनएसए स्तरावरील या बैठकीनंतर संबंधांमधील तणाव कमी होण्याची शक्यता आहे.
परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रियापरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या भेटीची पुष्टी करताना सांगितलं की, कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी आमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत चर्चा केली आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा एकदा पूर्ववत होण्याची आशा निर्माण झाली आहे.