Canada Justin Truedau : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारवर आणि वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे हा निर्णय घेतल्याचे ट्रुडो यांनी सांगितले. लिबरल पक्षाने आता नवीन नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू करावी. नवीन नेत्याची निवड होईपर्यंत मी कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम पाहीन, अशी माहिती त्यांनी दिली.
जस्टिन ट्रुडो यांनी आज(दि.6) राजधानी ओटावा येथे पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची घोषणा केली. जस्टिन ट्रूडो देशाला उद्देश केलेल्या आपल्या संभाषणात म्हटले की, "पुढील निवडणुकीत या देशाला पात्र नेता मिळेल. मला अंतर्गत लढाई लढावी लागणार असेल, तर त्या निवडणुकीत मी सर्वोत्तम निवड होऊ शकत नाही. नवीन पंतप्रधान आणि लिबरल पक्षाचे इतर नेते पक्षाची मूल्ये आणि आदर्श घेऊन पुढे जातील."
दरम्यान, जस्टिन ट्रुडो मागील 11 वर्षांपासून लिबरल पक्षाचे नेते आणि 9 वर्षांपासून पंतप्रधान आहेत. पण, गेल्या काही काळापासून त्यांना जगभरातील टीकेचा सामना करावा लागला आहे. खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर ट्रुडोंनी भारतावर आरोप केले होते. त्यामुळे कॅनडा आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. आता ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर कॅनडाचा नवीन पंतप्रधान कोण होणार, हे पाहणे महत्वाचे आहे.
जस्टिन ट्रूडोंची जागा कोण घेऊ शकेल?मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधानांचे सल्लागार पुढील पंतप्रधान कोण होणार, यावर चर्चा करत आहेत. ट्रूडोंच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडे दोन पर्याय असतील. पहिला म्हणजे, त्यांनी सर्वानुमते अंतरिम नेत्याची निवड करावी. दुसरा म्हणझे, नेत्याच्या निवडीसाठी पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्यात.
द ग्लोबच्या वृत्तानुसार, ट्रूडोंनी अर्थमंत्री डॉमिनिक लेब्लँक यांच्याशी चर्चा केली असून, त्यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. याशिवाय, बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी, यांचेही नाव चर्चेत आहे. याशिवाय, कॅनडाचे माजी अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांचेही नाव चर्चेत आहे. क्रिस्टिया गेल्या काही दिवसांपासून खासदारांना आपल्या बाजूने आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.