भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या पाकिस्तानमध्ये एका अज्ञान हल्लेखोराने आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनवा प्रांतातील स्वाबी जिल्ह्यात हत्यारबंद अज्ञात दुचाकीस्वाराने एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. मृत दहशतवाद्याचं नाव मौलाना काशिफ अली असं असून, तो कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर ए तोयबाचा वरिष्ठ कमांडर होता. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने मौलाना काशिफ अली याच्यावर निशाणा साधून गोळ्यांची बरसात केली. या गोळीबारात मौलाना काशिफ अली हा जागीच ठार झाला.
दहशतवादी काशिफ अली हा तरुणांचा ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये भरती करायचा. काशिफ अली हा अनेक मशिदी आमि मदरशांचा प्रभारीही होती. तो दहशतवादाचे धडे देऊन मदशात शिकणाऱ्या तरुणांना दहशतवादी संघटनेमध्ये भरती करायचा. त्याशिवाय तो दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जिहादी धडे देण्याचं कामही करायचा. काशिफ अली हा दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाची राजकीय संघटना असलेल्या पीएमएएमएलशीही संबंधित होता.
कुख्यात दहशतवादी असलेल्या काशिफ अली याच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनांशी निगडित असलेल्या अनेक संघटनांनी पाकिस्तान सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यासोबतचं त्यांनी काशिफ अटीची हत्या करणाऱ्या आरोपीला तातडीने पकडण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर काशिफ अली याचा दोष एवढाच होता की, तो पाकिस्तानवर प्रेम करत होता, अशा प्रकराची एक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, मागच्या काही काळापासून पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून बऱ्याच दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामध्या दहशतवाद्यांच्या काही वरिष्ठ कमांडर आणि नेत्यांचाही समावेश आहे.