पॅरीसमधल्या त्या दहशतवाद्यांना ५१ कोटींचे ईनाम देण्याची बसपाच्या नेत्याची तयारी
By Admin | Updated: January 8, 2015 15:07 IST2015-01-08T14:01:55+5:302015-01-08T15:07:27+5:30
पॅरीसमध्ये चार्ली हेब्दोच्या १० पत्रकारांना ठार मारणा-या दहशतवाद्यांना ५१ कोटी रुपयांचे ईनाम देण्यास आपण तयार आहोत असे बहुजन समाजवादी पार्टीचा नेता हाजी याकूब कुरेशी यांनी सांगितल्या

पॅरीसमधल्या त्या दहशतवाद्यांना ५१ कोटींचे ईनाम देण्याची बसपाच्या नेत्याची तयारी
>ऑनलाइन लोकमत
मीरत (उत्तर प्रदेश), दि. ८ - पॅरीसमध्ये चार्ली हेब्दोच्या १० पत्रकारांना ठार मारणा-या दहशतवाद्यांना ५१ कोटी रुपयांचे ईनाम देण्यास आपण तयार आहोत असे बहुजन समाजवादी पार्टीचा नेता हाजी याकूब कुरेशी यांनी सांगितल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. जरी इस्लामिक तज्ज्ञांनी धर्मामध्ये हिंसेला स्थान नाही असे म्हटले असले तरी, कुरेशी यांनी मात्र मुहम्मद पैगंबरांचा अवमान करणा-याला त्यांचे अनुयायी शिक्षा देणारच असे म्हटले आहे.
मुहम्मदांनी शांतीचा व प्रेमाच संदेश दिला, असे सांगतानाच कुरेशी यांनी मुहम्मदांचा अवमान करणा-या मृत्यूदंड दिलाच पाहिजे असे सांगताना त्यासाठी कायदेशीर सोपस्कारांची गरज नसल्याची मुक्ताफळेही उधळली आहेत.
याआधी आठ वर्षांपूर्वी ज्यावेळी डेन्मार्कच्या कार्टुनिस्टांनी मुहम्मदांवर कार्टून काढले होते, त्यावेळी कुरेशी त्या कार्टुनिस्टला ठार मारणा-याला ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. बुधवारच्या चार्ली हेब्दोवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुरेशी यांनी आपली भूमिका कायम असल्याचे आणि त्या हल्लेखोरांना ५१ कोटी रुपये देण्यास आपण तयार असल्याचे सांगितले आहे. कुरेशी यांची वक्तव्ये कायद्याच्या संदर्भात तपासण्यात येतील आणि त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे उत्तर प्रदेशातील पोलीस अधिका-यांनी सांगितले. चार्ली हेब्दोवरील हल्ल्यात १० पत्रकारांना ठार मारण्यात आले ज्यामध्ये फ्रान्समध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेल्या चार व्यंगचित्रकारांचा समावेश आहे. डेन्मार्कच्या त्या वादग्रस्त कार्टून्सना चार्लीने पुन्हा प्रकाशित केले होते, तसेच त्यानंतरही चार्ली हेब्दोने मुहम्मद पैगंबरांचा अवमान करणारी अनेक व्यंगचित्रे छापली होती. त्याचाच बदला घेत या मासिकाच्या कार्यालयावर बुधवारी दहशतवादी हल्ला करण्यात आला.