ब्रिटनकडे असलेल्या अमेरिकन बनावटीच्या एफ-३५बी विमानांमागचं शुक्लकाष्ठ काही केल्या सुटत नसल्याचं दिसत आहे. दोन महिन्यांपूर्वी ब्रिटिश रॉयल नेव्हीचं एक विमान एफ-३५बी हे विमान केरळमधील तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरवावं लागलं होतं. दरम्यान, आता ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एफ-३५बी या विमानाची जपानमध्ये आपातकालीन लँडिंग करावी लागली आहे. जपानमधील कागोशिमा विमानतळावर हे विमान उतरवण्यात आलं. त्यामुळे नियमित उड्डाणांना काही उशीर झाला.
याबाबत माहिती देताना ब्रिटिश रॉयल नेव्हीने सांगितले की, एफ-३५बी या लढाऊ विमानाला एचएमएस प्रिंस ऑफ वेल्स येथून उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे जपानमधील कागोशिमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उरवावे लागले. आता विमानाचं निरीक्षण केलं जात आहे. तसेच हे विमान लवकरात लवकर कॅरियर स्ट्राइक ग्रुपमध्ये परत जाईल.
तर कागोशिमा विमानतळ प्रशासनाने सांगितले की, वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला तांत्रिक समस्येबाबत माहिती दिल्यानंतर विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता आपातकालीन लँडिंग केलं. दरम्यान, जपानच्या सरकारी वृत्तवाहिनीने चित्रफितीमध्ये हे विमान विमानतळावर उभं असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, या आधी १४ जून रोजी ब्रिटनमधून ऑस्ट्रेलियाला जात असलेलं एक एफ-३५बी लढाऊ विमान हायड्रॉलिक फेल्युअरनंतर भारतातील केरळमधील तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरवण्यात आलं होतं. त्यानंतर हे विमान बरेच दिवस तिथेच उभं होतं.