ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ यांना हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 00:12 IST2016-09-01T00:12:31+5:302016-09-01T00:12:31+5:30
ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ (६८) यांना बुधवारी पदावरून हटविण्यात आले.

ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ यांना हटविले
ऑनलाइन लोकमत
ब्रासिलिया, दि. 1 - ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ (६८) यांना बुधवारी पदावरून हटविण्यात आले. राष्ट्रीय अर्थसंकल्पात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राष्ट्रपतींना हटविण्यासाठी दोनतृतीयांश मतांची गरज असते. आजच्या या महाभियोगात ८१ पैकी ६१ सिनेटर्सनी त्यांना दोषी ठरविले. त्यानंतर त्यांना तात्काळ पदावरून हटविण्यात आले. यामुळे डाव्या विचारांच्या १३ वर्षांच्या शासनाचा अंत झाला आहे.
दरम्यान, मायकेल टेमर हे आता ब्राझीलचे नवे राष्ट्रपती असतील. इलेक्ट्रॉनिक वोटिंग स्क्रीनवरील ही आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक सिनेटर्सच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दरम्यान, डिल्मा रोसेफ यांच्या निवासस्थानाबाहेर पन्नासहून अधिक डाव्या विचारांचे आंदोलक त्यांच्या समर्थनार्थ एकत्र आले होते. लोकशाहीच्या संरक्षणासाठी आमचे आंदोलन असल्याचे ते सांगत होते. राजधानीत अतिरिक्त सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
तत्पूर्वी सोमवारी १४ तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेत आपली बाजू मांडताना डिल्मा रोसेफ यांनी सांगितले की, आपण निर्दोष आहोत. बेरोजगारी आणि महागाईमुळे देशात अनेक समस्या निर्माण झाल्या असताना राजकीय पातळीवरही देशात वर्षभरापासून असंतोष होता.