सध्या पाकिस्तानी तरुंगात कैद असलेले पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकारणात परतण्यासाठी आता एक नवी खेळी रचली आहे. यावेळी त्यांनी भारताचं कौतुक देखील केल्याचं म्हटलं जात आहे. जर इम्रान खान यात यशस्वी झाले तर, पाकिस्तनच्या सध्याच्या सरकारला मोठा हादरा बसू शकतो. पाकिस्तानी वृत्तपत्र ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, आदियाला तुरुंगातून इम्रान खान यांनी दोन संदेश पाठवले आहेत.
इम्रान खान यांनी पाठवलेला पहिला संदेश त्यांच्या दोन्ही मुलांसाठी आहे, हे सध्या लंडनमध्ये आहेत. तर, दूसरा संदेश त्यांनी आपल्या वक्तव्यांना जगभरात पोहोचवणाऱ्या पत्रकारांसाठी पाठवला आहे.
काय म्हणाले इम्रान खान?
इम्रान खानने आपला पहिला संदेश दोन्ही मुलांसाठी पाठवला आहे. यात त्याने दोन्ही मुलांना आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. वडिलांचा संदेश मिळताच आता मुलांनी देखील जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. आता इम्रान खान यांच्या दोन्ही मुलांनी मुलाखती देत, जगातील सगळ्या देशांनी पाकिस्तानच्या या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले की, पाकिस्तानात लोकशाही नाही. आम्हाला आमच्या वडिलांना तुरुंगातून बाहेर काढायचे आहे. आम्ही सगळ्या देशांकडे मदत मागत आहोत. आता पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर यायला हवा.
इम्रान खानने दुसरा संदेश पत्रकारांना दिला आहे. त्यांनी म्हटलं की, पाकिस्तान सरकार युद्धविरामाचा आनंद साजरा करत आहे, परंतु तणावात मानसिक लढाई लढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. इम्रान खान यांच्या मते, युद्ध परिस्थितीत ६० टक्के लढाई मानसिकदृष्ट्या लढली जाते. भारताने यामध्ये पुढाकार घेतला आहे. भारत पुन्हा हल्ला करण्याची तयारी करत आहे. हे माहीत असूनही पाकिस्तानचे राज्यकर्ते आनंद साजरा करत आहेत. या सरकारविरुद्ध लोकांनी आवाज उठवण्याची गरज आहे.
इम्रान खान यांची मुलं झाली सक्रिय!इम्रान खान तुरुंगात गेल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे दोन्ही मुलगे सक्रिय भूमिका बजावताना दिसले आहेत. इम्रानच्या दोन्ही मुलांनी म्हटले आहे की, ते त्यांच्या वडिलांसाठी दीर्घ लढाई लढतील. यादरम्यान असेही म्हटले जात आहे की, येत्या काळात इम्रान यांची मुलं एक मोहीम चालवतील आणि त्यांच्या समर्थकांना सोशल मीडियावर एकत्र करतील, जेणेकरून त्यांना सरकारविरुद्ध बंड पुकारता येईल.