Indian Student Death:रशियातील उफा शहरात १९ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृतदेह गुरुवारी (६ नोव्हेंबर) स्थानिक धरण परिसरात सापडला आहे. अजित सिंह चौधरी (वय २२) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ येथील कफानवाडा गावातील रहिवासी होता. अजित चौधरी हा २०२३ मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियाला गेला होता आणि त्याने बश्किर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला होता.
दूध घेण्यासाठी गेलेला परतलाच नाही
अजित १९ ऑक्टोबर रोजी उफा शहरातून बेपत्ता झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अजित सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वसतिगृहातून 'दूध आणण्यासाठी जातो' असे सांगून बाहेर पडला, मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. अजितचा मृतदेह व्हाइट रिव्हर जवळील एका धरणाच्या परिसरात सापडला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली
कपडे आणि वस्तू नदीकाठी सापडल्या
या घटनेला १९ दिवस उलटल्यानंतर, काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह अलवर यांनी या प्रकरणावर गंभीर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, "१९ दिवसांपूर्वीच नदीच्या किनारी अजितचे कपडे, मोबाईल फोन आणि बूट सापडले होते. संशयास्पद परिस्थितीत मुलासोबत (अजित) काहीतरी अप्रिय घटना घडली असावी. कफानवाडा गावातील अजितला त्याच्या कुटुंबाने मोठ्या अपेक्षांसह आणि कष्टातून जमवलेले पैसे खर्च करून वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाला पाठवले होते. आज अजितचा मृतदेह नदीत सापडल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. अलवर कुटुंबासाठी हा खूप दुःखद क्षण आहे; संशयास्पद परिस्थितीत आम्ही एक होतकरू तरुण मुलगा गमावला."
परराष्ट्र मंत्र्यांकडे मृतदेह आणण्याची मागणी
या दुर्दैवी घटनेनंतर रशियातील भारतीय दूतावासाकडून त्वरित कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, पण त्यांनी गुरुवारी चौधरी यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. या बातमीनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विनंती केली आहे की, त्यांनी या विद्यार्थ्याचा मृतदेह तातडीने भारतात आणण्यासाठी मदत करावी. तसेच, मुलासोबत घडलेल्या अप्रिय घटनेची गंभीरपणे चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशनच्या परदेशी मेडिकल स्टुडंट्स विंगनेही या चौकशीसाठी जयशंकर यांच्याशी संपर्क साधला आहे.
Web Summary : Rajasthan student, Ajit, studying in Russia, was found dead after disappearing 19 days ago. He left to buy milk. Investigation and repatriation are requested.
Web Summary : रूस में पढ़ रहे राजस्थान के छात्र अजित 19 दिन पहले लापता होने के बाद मृत पाए गए। वह दूध लेने गए थे। जांच और प्रत्यावर्तन का अनुरोध किया गया है।