ब्लाटरची अमेरिका व युरोपवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2015 01:31 IST2015-05-31T01:31:09+5:302015-05-31T01:31:09+5:30
फिफाच्या अध्यक्षपदी पाचव्यांदा निवड झाल्यानंतर सॅप ब्लाटर यांनी अमेरिका व युरोपवर टीकास्त्र सोडले.

ब्लाटरची अमेरिका व युरोपवर टीका
ज्युरिच : फिफाच्या अध्यक्षपदी पाचव्यांदा निवड झाल्यानंतर सॅप ब्लाटर यांनी अमेरिका व युरोपवर टीकास्त्र सोडले. ब्लाटर म्हणाले, ‘फुटबॉलच्या जागतिक संस्थेला लक्ष्य करण्याच्या अमेरिकेच्या न्यायपालिकेमुळे स्तब्ध झालो.’ या व्यतिरिक्त युरोपीयन फुटबॉलच्या अधिकाऱ्यांच्या विरोध मोहिमेवरही टीका केली.
शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीच्या मतदानापूर्वी प्रतिस्पर्धी प्रिन्स अली बिन अल हुसेन यांनी माघार घेतल्यामुळे ब्लाटर यांची पाचव्यांदा फिफाच्या अध्यक्षपदी निवड झाली. स्विस दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत ब्लाटर म्हणाले, ‘बुधवारी अमेरिकन भ्रष्टाचारविरोधी पकड वॉरंटच्या आधारावर फिफाच्या अधिकाऱ्यांना झालेली अटक म्हणजे काँग्रेसमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होता.’ शुक्रवारी फिफा काँग्रेसने ब्लाटर यांची नव्या कार्यकाळासाठी पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड केली.
निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अटकसत्रावर प्रतिक्रिया देताना ब्लाटर म्हणाले, ‘मला खात्री नसली तरी यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आहे.’ ब्लाटर यांनी अमेरिकी अॅटर्नी जनरल लोरेटा लिंचसह अमेरिकन न्यायपालिकेने फिफावर केलेल्या टीकेचा त्यांनी निषेध केला.
२०२६ च्या विश्वकप यजमानपदाचा दावा करण्याची युरोपियन देशांना संधी : ब्लाटर
ज्युरिच : युरोपियन फुटबॉल संघटनांच्या विरोधानंतरही सलग पाचव्यांदा आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदी निवड झालेले सॅप ब्लाटर यांनी २०२६ मध्ये होणाऱ्या विश्वकप स्पर्धेच्या यजमानपदासाठी दावा करण्याची युरोपियन देशांना संधी असल्याचे म्हटले आहे.
युरोप व्यतिरिक्त न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया यांच्या विरोधानंतरही पुन्हा एकदा अध्यक्षपदी विराजमान झालेले ब्लाटर म्हणाले, ‘२०२६ मध्ये होणाऱ्या विश्वकप स्पर्धेसाठी आशियाई देश वगळता अन्य सर्व खंडातील देशांना यजमानपदासाठी दावेदारी सादर करण्याची संधी असल्याचा निर्णय कार्यकारी समितीने घेतला आहे. ब्लाटर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला काही नियमांमध्ये बदल करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. त्यानुसार एकाच खंडात सलग दोनदा स्पर्धा आयोजित करता येणार नाही, या नियमाचा समावेश होता.