ब्लॅकबॉक्ससाठी आठवडा लागणार
By Admin | Updated: January 2, 2015 02:25 IST2015-01-02T02:25:51+5:302015-01-02T02:25:51+5:30
एअर एशियाच्या जलसमाधी मिळालेल्या जेट विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडल्यास अपघातग्रस्त विमानात अखेरच्या क्षणी काय घडले यावर प्रकाश पडू शकतो;

ब्लॅकबॉक्ससाठी आठवडा लागणार
जकार्ता/सिंगापूर : एअर एशियाच्या जलसमाधी मिळालेल्या जेट विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडल्यास अपघातग्रस्त विमानात अखेरच्या क्षणी काय घडले यावर प्रकाश पडू शकतो; पण हा बॉक्स हाती लागण्यास आठवडा जाऊ शकतो, असे इंडोनेशियाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. जावा समुद्रात विमानाचे अवशेष विखुरलेले असून, मृतदेह पाण्यावर तरंगत आहेत. हे अवशेष व मृतदेह वर काढण्यासाठी शोध पथकाची मोहीम सुरू आहे.
पांगकलान बन परिसरातील हवामानात अजूनही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे समुद्रात पडलेल्या ए३२०-२०० विमानाचे अवशेष व विमानातील १६२ लोकांचे मृतदेह मिळविणे ही कसोटी आहे. विमानातील फ्लाईट रेकॉर्डर वा ब्लॅकबॉक्स मिळण्यास समुद्र शांत असेल तर आठवडा जावा लागेल, असे इंडोनेशियाच्या वाहतूक सुरक्षा केंद्राचे प्रमुख अँटोनियस टूस सँतियोसो यांनी म्हटले आहे. जावा समुद्रात गुरुवारी स्वच्छ ऊन पसरले होते. त्यामुळे अवशेष व मृतदेह आज हाती लागण्याची शक्यता आहे. विमानाच्या फ्युजलेजमध्ये मृतदेह अडकले असावेत, असा अंदाज आहे. त्यामुळे विमानाच्या फ्युजलेजचा भाग शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. पाण्याखाली काम करणारी सिंगापूरची उपकरणे समुद्र तळाचा शोध घेत आहेत. या उपकरणांना सोनर यंत्रणा बसविलेली आहे. त्यामुळे सागर तळीच्या वस्तूंची छायाचित्रे पडद्यावर दिसू शकतात.
च्रविवारी सकाळी एअर एशियाचे फ्लाईट क्र. क्यूझेड ८५०१ हे सिंगापूरला जाणारे जेट विमान गायब झाले होते. या विमानाचे अवशेष मिळण्यास हवामानाचे अडसर निर्माण झाले होते.
च्गुरुवारी समुद्र थोडा शांत असल्याने मृतदेह वर काढले जाण्याची शक्यता होती; पण दुपारनंतर वातावरण बदलले असून, हेलिकॉप्टरवर मुसळधार पाऊस आदळत आहे. जहाजे अशा वातावरणातही कार्यरत आहेत.