गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानविरोधात बलुच लिबरेशन आर्मीने मोर्चा वळवला आहे. पाकिस्तानी सैन्यावर त्यांनी हल्ले सुरूच ठेवले आहेत. आज पाकिस्तानी सैन्याला पळवले आणि पोलिस, अनेक सरकारी आस्थापनांसह ३९ ठिकाणी हल्ला करून सरकारी यंत्रणेचे मोठे नुकसान केल्याचा दावा केला.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी अनेक दशकांपासून लढा देत असलेला बीएलए पाकिस्तानच्या भारतासोबतच्या संघर्षादरम्यान अचानक सक्रिय झाला. काही तासांतच त्यांनी ३९ हल्ले केले. संस्थेने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.
सरकारी ऑफिसवर हल्ला
बीएलएचे प्रवक्ते जियान बलोच म्हणाले की, संघटनेची कारवाई सुरूच आहे. संघटनेच्या लढवय्यांनी लष्करी काफिले, पोलिस ठाणी, अनेक महामार्ग आणि सरकारी प्रतिष्ठानांवर हल्ला करून त्यांचे नुकसान केल्याचे सांगण्यात आले.
या संघटनेने प्रांतातील अनेक पोलिस ठाणी ताब्यात घेतली आहेत. अनेक रस्ते बंद केले आहेत. संस्थेच्या कृती आणि हस्तगत केलेल्या ठिकाणांची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल.
या भागात नैसर्गिक संपत्तीचे प्रचंड साठे आहेत. पाकिस्तान सरकार या राखीव जागेचा वापर स्वतःच्या हितासाठी करत आहे पण प्रांतातील लोकांना काहीही मिळत नाही, असा दावा बीएलएने केला.
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे विलक्षण कोंडी झालेल्या व भेदरलेल्या पाकिस्तानने अखेर शनिवारी नांगी टाकली व शस्त्रसंधी करण्यासाठी बाबापुता केला. दोन्ही बाजूंनी घोषणाही झाली. मात्र, घोषणेच्या तीन तासांनंतरच शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार करत उखळी तोफांचा मारा केला. यात ७ नागरिकांचा मृत्यू झाला. तर सीमा सुरक्षा दलाचे आठ जवानही जखमी झाले आहेत. सारासार विचारांती भारताने होकार दिल्यानंतर शनिवारी संध्याकाळी ५ वाजेपासून शस्त्रसंधी लागू झाली होती.
भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शविल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी जाहीर केले. अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशांत झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. मध्यस्थी करत असलेल्या चर्चेनंतर ही सहमती झाल्याचे त्यांनी सांगितले. पण रात्रीचे चित्र पुन्हा युद्धासारखेच होते.