पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटला आहे. भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे. यामुळे बिथरलेला पाकिस्तान भारताला युद्धाची धमकी देत आहे. पण, स्वतःमात्र बलुचिस्तान गमावण्याच्या मार्गावर दिसत आहे. यातच बलुचिस्तानमधून एक मोठी बातमी आली आहे. कलात जिल्ह्यातील मंगोचर शहरात, बलुच बंडखोरांनी एकामागून एक अनेक सरकारी इमारती ताब्यात घेतल्या आणि नंतर त्यांना आग लावली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये बंडखोर या इमारतींचा ताबा घेताना आणि पाकिस्तानविरुद्ध घोषणाबाजी करताना दिसत आहेत. ही संपूर्ण कारवाई शुक्रवारी रात्री घडल्याचे बोलले जात आहे. यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्वेट्टा कराची महामार्ग बंद -स्थानिक माध्यमांतील वृतांनुसार आणि डॉनच्या वृत्तानुसार, बंडखोरांनी क्वेटा कराची महामार्ग रोखला होता आणि तेथून जाणाऱ्या वाहनांची झडती घेतली. दरम्यान त्यांनी, NADRA कार्यालय, न्यायालयीन संकुल आणि नॅशनल बँकेची शाखा, अशा अनेक सरकारी इमारती ताब्यात घेतल्या आणि नतंर त्यांना आग लावली. या आगीमुळे या इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे. यानतंर, पाकिस्तानी सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत बंडखोर पळून गेले होते. पाकिस्तानी सैनिकांनी रात्री उशिरा केलेल्या या कारवाईनंतर, महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली.
बंडखोरांनी शस्त्रे जप्त केली -महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानी लष्कराच्या छावणीवरही बंडखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात बंडखोरांनी काही शस्त्रेही जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पाकिस्तानने भारताच्या भीतीने सीमेवर सैन्य तैनात केले आहे. असे असतानाच हा हल्ला झाला आहे. मंगोचरमधील या घटनेने पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण पोलखोल केली आहे. महत्वाचे म्हणजे, या घटनेवरून बलुच बंडखोरांचा वाढता आत्मविश्वास दिसून येतो.