वॉशिंग्टन : चीनला व्यापार युद्धात गुंडाळण्यासाठी आशियाच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना अमेरिकेच्या सिनेटमध्ये मोठा धक्का बसला आहे. आपल्या विरोधात एक जाहिरात केल्याने रागातून कॅनडावर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा ट्रम्प यांचा अधिकार सिनेटने काढून घेतला आहे.
एका टीव्ही जाहिरातीवरून झालेल्या वादातून ट्रम्प यांनी हा टॅरिफ वाढवला होता. या जाहिरातीला 'शत्रुत्वपूर्ण पाऊल' ठरवत ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला होता, जो आता सिनेटने निष्प्रभ ठरवला आहे. बुधवारी अमेरिकेच्या सिनेटमध्ये या प्रस्तावावर मतदान झाले. ट्रम्प यांना विरोध करत, हा प्रस्ताव ५० विरुद्ध ४६ मतांनी मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या स्वतःच्या रिपब्लिकन पक्षाच्या चार सिनेटर्सनी डेमोक्रॅट्ससोबत हातमिळवणी करून ट्रम्प यांच्या अधिकारावर अंकुश ठेवला आहे.
डेमोक्रॅटिक सिनेटर टिम केन यांनी हा प्रस्ताव पुन्हा सिनेटमध्ये मांडला होता. "कॅनडावर टॅरिफ लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणीबाणी आर्थिक शक्ती कायद्याचा (IEEPA) वापर करणे योग्य नाही. कॅनडासोबतचे मजबूत संबंध तोडणे हे या टॅरिफचे मोठे नकारात्मक परिणाम आहेत.'' असे ते म्हणाले होते. यापूर्वी ब्राझीलवर टॅरिफ लावण्याच्या ट्रम्प यांच्या अधिकाराला आव्हान देणारा प्रस्तावही सिनेटने मंजूर केला होता.
हे चार रिपब्लिकन सिनेटर्स ठाम राहिले...
ट्रम्प यांच्या पक्षाच्या चार सिनेटर्सनी ट्रम्प यांना तोंडघशी पाडले आहे. सुसान कॉलिन्स (मेन), मिच मॅककोनल (केंटकी), लिसा मुर्कोव्स्की (अलास्का), रँड पॉल (केंटकी) यांनी ट्रम्प यांच्या प्रस्तावाविरोधात मतदान केले. या सिनेटरनी ट्रम्प यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने हा प्रस्ताव पास होऊ शकला. यामुळे अमेरिकेच्या व्यापार धोरणांवर ट्रम्प यांच्या भूमिकेला त्यांच्याच पक्षातून आव्हान मिळत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. आपल्या व्यापार धोरणांवर टीका करणारी टीव्ही जाहिरात कॅनडाने दाखवल्यामुळे ट्रम्प यांनी सूडबुद्धीने हे अतिरिक्त शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तो आता त्यांच्याच अंगलट आला आहे.
Web Summary : Trump faced a setback as the Senate revoked his authority to impose a 10% tariff on Canada. Four Republican senators joined Democrats in opposing Trump's decision, which was triggered by a TV ad. The move highlights growing dissent within his party over trade policies.
Web Summary : सीनेट ने ट्रम्प को झटका देते हुए कनाडा पर 10% शुल्क लगाने का उनका अधिकार रद्द कर दिया। चार रिपब्लिकन सीनेटरों ने डेमोक्रेट्स के साथ मिलकर ट्रम्प के फैसले का विरोध किया, जो एक टीवी विज्ञापन से शुरू हुआ था। यह कदम उनकी पार्टी में व्यापार नीतियों पर बढ़ते असंतोष को उजागर करता है।