इराक, सिरियामध्ये इसिसची पीछेहाट
By Admin | Updated: June 9, 2015 00:47 IST2015-06-09T00:47:56+5:302015-06-09T00:47:56+5:30
इसिस वा इस्लामिक संघटनेच्या जिहादीना सिरियातील हसकाह शहरातून हुसकावून लावण्यात सिरियाच्या सैनिकांना यश आले आहे.

इराक, सिरियामध्ये इसिसची पीछेहाट
दमास्कस : इसिस वा इस्लामिक संघटनेच्या जिहादीना सिरियातील हसकाह शहरातून हुसकावून लावण्यात सिरियाच्या सैनिकांना यश आले असून, सिरियाच्या ईशान्येकडील मोठा भूप्रदेश इसिसच्या ताब्यातून मुक्त करण्यात आल्याचा दावा सिरीयाई सैन्याने केला आहे. यामुळे सिरियावरील इसिसची पकड सैल झाली असून, आता सिरियाचे सैनिक इसिसच्या तळावर हल्ले करत आहेत.
दरम्यान, इराकमध्येही बाईजी हे शहर जिंकण्यासाठी इसिसचा संघर्ष चालला असून, इराकी सैन्याने इसिसच्या जिहादीना मागे ढकलल्याचा दावा करण्यात येत आहे.
बाईजी येथील प्रचंड क्षमतेच्या तेल शुद्धी प्रकल्पावरून इसिसच्या जिहादींना मागे हटविण्याचे प्रयत्न चालू आहेत. इराकची राजधानी बगदाद व आसपासच्या भागातून इसिसची पीछेहाट झाली आहे, पण पश्चिम इराकवरील इसिसचा प्रभाव कायम आहे. इसिसच्या दबिक मासिकातील एका लेखानुसार पकडलेल्या नागरिकांचे शिरच्छेद, बलात्कार असे छळ करण्यात गैर काही नाही. (वृत्तसंस्था)
इसिसची विचारधारा मांडणारे हे मासिक काही काळ आॅनलाईन विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यावेळी हातात आलेल्या प्रतीनुसार मुस्लिम धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांचे शिरकाण करा, महिलांवर बलात्कार करा त्यात गैर असे काही नाही. रासायनिक शस्त्रास्त्रे तयार करण्याचे ज्ञान ज्यांना आहे, त्यांनी इसिसमध्ये यावे, असे आवाहनही या मासिकाद्वारे करण्यात आले आहे.