Sheikh Hasina Extradition, India Bangladesh Relations : बांगलादेशनेभारताकडे शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला भारताने फारसे महत्त्व दिलेले नाही. त्यांना अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. अशा स्थितीत या मुद्द्यावर बांगलादेशचे पुढचे पाऊल काय असेल, हा मोठा प्रश्न आहे. ते भारताला स्मरणपत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, ढाका नवी दिल्लीला स्मरणपत्र पाठवणार आहे.
बांगलादेशचे म्हणणे काय?
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्हाला अद्याप नवी दिल्लीकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. आम्ही उत्तराची वाट पाहू. जर आम्हाला ते निर्धारित वेळेत मिळाले नाही तर आम्ही स्मरणपत्र पाठवू. एका प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ढाक्याचे पुढील पाऊल दिल्लीच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. आम्ही यावेळी परिस्थितीवर भाष्य करू इच्छित नाही किंवा अंदाज बांधू इच्छित नाही.
बांगलादेशने नवी दिल्लीत एक राजकीय नोट पाठवून भारत सरकारने बांगलादेशातील न्यायालयीन कार्यवाहीसाठी हसीनाचे प्रत्यार्पण करण्याची विनंती केली होती. बांगलादेशच्या मागणीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जुलैमध्ये झालेल्या बंडखोरीदरम्यान हसीना यांच्यावर १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बांगलादेशस्थित इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रिब्युनल (ICT) ने हसीना यांच्याविरुद्ध मानवता आणि नरसंहाराच्या गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांचे सरकार ५ ऑगस्टला पडले. त्यानंतर शेख हसीना सत्ता सोडल्यानंतर भारतात आल्या.
भारत आणि बांगलादेश यांनी २०१३ मध्ये प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी केली, परंतु हा करार अस्तित्वात आहे याचा अर्थ असा नाही की नवी दिल्लीला शेख हसीना यांना ढाका येथे सोपवावे लागेल. करारानुसार, गुन्हा राजकीय स्वरूपाचा असल्यास प्रत्यार्पणाला नकार दिला जाऊ शकतो. मात्र, राजकीय मानता येणार नाही अशा गुन्ह्यांची यादी बरीच मोठी आहे. हसीना यांच्यावर ज्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी काही गुन्ह्यांना या करारातील राजकीय गुन्ह्यांच्या व्याख्येतून वगळण्यात आले आहे.