India Vs Bangladesh: बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी भारताविरोधी वक्तव्ये करणं सुरुच ठेवलं आहे. मोहम्मद युनूस यांनी गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये बोलताना भारत-बांगलादेश संबंधांवर एक वादग्रस्त विधान केले. भारत आणि बांगलादेशमध्ये सध्या अडचणी आहेत, कारण गेल्या वर्षी भारताला विद्यार्थ्यांनी केलेल आंदोलन आवडले नव्हते, असं युनूस म्हणाले. त्यांनी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना पुन्हा सक्रिय करण्यासाठी आग्रह धरला, ज्यामध्ये बांगलादेश प्रादेशिक व्यापार आणि सागरी प्रवेशासाठी एक पूल म्हणून काम करेल.
बांगलादेशात झालेल्या बंडानंतर मोहम्मद युनूस यांनी सरकारची सूत्रे हाती घेतली. नोबेल पारितोषिक विजेते युनूस यांच्या कारकिर्दीत हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाला. आता न्यूयॉर्क येथे दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या भारतात राहिल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे मोहम्मद युनूस यांनी म्हटलं. भारत माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे आदरातिथ्य करत आहेत, ज्या आपल्या देशातील अनेक समस्यांचे कारण आहेत, असेही युनूस म्हणाले. युनूस यांनी अनेक तरुणांच्या हत्येसाठी शेख हसीना यांना जबाबदार धरले. यामुळेच भारत आणि बांगलादेशमध्ये तणाव निर्माण झाल्याचे युनूस यांनी म्हटलं.
गेल्या वर्षी बंडानंतर शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या. तेव्हापासून त्या भारतात आहेत. युनूस यांनी वारंवार भारत सरकारला हसीना यांना त्यांच्या स्वाधीन करण्याची विनंती केली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये हसीना राजीनामा देऊन भारतात परतल्या तेव्हा भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडू लागले. नोकरीच्या कोट्यात झालेल्या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते, ज्यामुळे बांगलादेशात सत्तापालट झाला. युनूस यांनी भारतावर बांगलादेशविरुद्ध खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोपही केला.
"गेल्या वर्षी शेख हसीना यांना पायउतार व्हावे लागलेल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनांना भारताने पसंत न केल्यामुळे ढाक्याचे नवी दिल्लीशी संबंध ताणले गेले आहेत. ते (भारत) माजी पंतप्रधान शेख हसीना यांचेही आदरातिथ्य करत आहेत, ज्या आपल्या देशातील अनेक समस्यांचे कारण आहेत. याशिवाय, दुसऱ्या बाजूने अनेक प्रकारच्या खोट्या बातम्या येत आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारचे प्रचार केले जात आहेत की ही एक इस्लामिक चळवळ आहे ज्याने बांगलादेशवर कब्जा केला आहे. हा आम्हाला इस्लामी आणि तालिबान म्हणून दाखवण्याचा प्रचार करण्यासारखे आहे. तुम्ही मला तालिबानी म्हणाल का? मला दाढी नाही, मी ती घरी ठेवली आहे. ते मला तालिबान प्रमुख म्हणतात. पण आम्हाला ते करण्याची गरज नाही," असं मोहम्मद युनूस म्हणाले.