Bangladesh Muhammad Yunus Govt: बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे समजते. देशातील राजकीय परिस्थिती आणि त्यात सुरू असलेल्या घडामोडी यामुळे युनूस चिंतेत आहेत. अशा वातावरणात आपल्याला उत्तम काम करता येईल का, याबाबत युनूस यांना शंका असल्याचे म्हटले जात आहे. यातच आता बांगलादेशमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे समजते.
बांगलादेशमधील परिस्थिती अधिकाधिक तणावपूर्ण होत चालल्याचे सांगितले जात आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या धोरणांविरुद्ध नागरी प्रशासन आणि व्यावसायिक क्षेत्रात निदर्शने सुरू आहेत. ढाका शहरात परिस्थिती बिकट होत चालली आहे. रविवारी सरकारी कर्मचाऱ्यांनी बांगलादेश सचिवालयात सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने केली. प्रस्तावित सरकारी सेवा (सुधारणा) अध्यादेश, २०२५ विरोधात ही निदर्शने करण्यात येत आहेत. हा अध्यादेश मागे घेण्याची मागणी केली जात आहे. आंदोलकांनी या अध्यादेशाला काळा कायदा म्हटले आहे. दुसरीकडे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. राष्ट्रीय महसूल मंडळाचे अधिकारीही नवीन अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशी सामूहिक सुट्टीवर गेले. बांगलादेशातील सर्व आयात-निर्यातीची कामे अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
बांगलादेश सध्या युद्धसदृश परिस्थितीतून जात आहे
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी म्हटले आहे की, बांगलादेश सध्या युद्धसदृश परिस्थितीतून जात आहे. अवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आल्यापासून देशात युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे देश पुढे जाऊ शकत नाही. सर्व काही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आपण पुन्हा गुलामगिरीकडे ढकलले गेले आहोत, असे मोहम्मद युनूस यांचे माध्यम सचिव शफीकुल आलम यांनी एका जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुहम्मद युनूस यांनी राजकीय अतिथी गृहात झालेल्या दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या २० नेत्यांची भेट घेतली. यामध्ये अवामी लीगवर बंदी घालण्यात आल्यापासून परिस्थिती अस्थिर करण्याचे सतत प्रयत्न सुरू आहेत. यापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे, असे या बैठकांमध्ये युनूस यांनी म्हटले आहे.
कामगारांना बोनस आणि पगार कसे द्यायचे?
१९७१ च्या मुक्तिसंग्रामात ज्या पद्धतीने बुद्धिजीवी मारले गेले त्याच पद्धतीने देशातील व्यावसायिकांना मारले जात असल्याचा मोठा आरोप बांगलादेशमधील एक प्रमुख व्यावसायिक समुदायाचे नेते शौकत अझीझ रसेल यांनी सांगितले. अधिकाधिक लोक बेरोजगार झाल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. कामगारांना बोनस आणि पगार कसे द्यायचे हे आम्हाला माहित नाही, असेही रसेल यांनी म्हटले आहे. सरकार गुंतवणूकदारांना आमंत्रित करत आहे, परंतु परदेशातील गुंतवणूकदारांना हे चांगलेच माहिती आहे की, बांगलादेशात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय नाही; त्यांना माहिती आहे की, व्हिएतनाम बांगलादेशपेक्षा जास्त फायदेशीर आहे, असेही रसेल यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारी प्राथमिक विद्यालयांमध्ये शिक्षकांनीही विविध मागण्यांसाठी अनिश्चित काळापर्यंत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. तसेच युनूस यांनी देशात निवडणुका घेण्यासाठी आणखी ६ महिन्यांचा कालावधी मागितला आहे. या वर्षी डिसेंबर ते पुढील वर्षी जून दरम्यान निवडणुका होतील. युनूस यांनी रविवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, ते पुढील वर्षी ३० जूननंतर पदावर राहणार नाहीत आणि त्या अंतिम मुदतीपूर्वी राष्ट्रीय निवडणुका होतील.