बलुच नेते बुग्तींची हत्या; परवेझ मुशर्रफ दोषी
By Admin | Updated: January 15, 2015 06:20 IST2015-01-15T06:20:03+5:302015-01-15T06:20:03+5:30
पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ हे बलुच नेते नवाज अकबर खान बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी दोषी असल्याचा निकाल पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दिला आहे.

बलुच नेते बुग्तींची हत्या; परवेझ मुशर्रफ दोषी
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ हे बलुच नेते नवाज अकबर खान बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी दोषी असल्याचा निकाल पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दिला आहे. बुग्ती हे लष्कराच्या दहशतवादविरोधी कारवाईत मारले गेले होते.
पाकिस्तानातील क्वेट्टा येथील न्यायालयाने मुशर्रफ (७१) यांना दोषी ठरविले असून, पुढची सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी होईल, असे जाहीर केले आहे. ४ फेब्रुवारीनंतर या प्रकरणाची सुनावणी दररोज होईल, असेही न्यायालयाने जाहीर केले आहे.
बुग्ती हे बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री होते, तसेच त्यांच्या जमातीचेही प्रमुख होते. तत्कालीन अध्यक्ष व लष्करप्रमुख असणाऱ्या मुशर्रफ यांनी आदेश दिलेल्या लष्करी कारवाईत ते २००६ साली मारले गेले. त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशात निषेध मोर्चे निघाले. त्यानंतर बलुचिस्तानात सशस्त्र दहशतवाद पुन्हा सुरू झाला.
बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी मुशर्रफ यांच्याबरोबर आणखी दोन आरोपी आहेत. मुशर्रफ यांचे गृहमंत्री आफताब खान शेरपाओ व माजी प्रांतिक गृहमंत्री शोएब नुशरवान हेही या प्रकरणी दोषी ठरले आहेत.
सुनावणीत आधी मुशर्रफ यांच्या वकिलाने त्यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला. मुशर्रफ यांना पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना न्यायालयात उपस्थित न राहण्याची परवानगी द्यावी, असे वकिलांनी म्हटले होते. खटला सुरू झाल्यापासून मुशर्रफ कधीच न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळेच त्यांना दोषी ठरविले गेले असेही बोलले जात आहे. मुशर्रफ यांच्यावर २००७ साली माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची हत्या केल्याचाही आरोप आहे. त्या प्रकरणी त्याना जामीन मिळाला आहे. (वृत्तसंस्था)