Azerbaijan Airlines plane crashes in Kazakhstan : कझाकिस्तानमधील अकताऊ विमानतळाजवळ अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या विमानात 67 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर होते. रशियन वृत्तसंस्थांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. तसेच, अझरबैजानी विमान बाकूहून ग्रोझनीला जात होते, असे कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, कझाकिस्तानमधील अकताऊ विमानतळाजवळ शहरातील एअरपोर्टवर लँडिंगदरम्यान विमान कोसळले आणि विमानाताला मोठी आग लागली. या विमानात 67 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर होते. त्यापैकी बहुतेक अझरबैजानी आणि रशियन नागरिक होते, असे सोशल मीडियाद्वारे सांगण्यात येत आहे. या अपघातातून जवळपास 25 प्रवासी बचावल्याची माहितीही सोशल मीडियावर येत आहे. तर 42 जणांचा अद्याप शोध लागलेला नाही, असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अकाटूपासून तीन किलोमीटर अंतरावर इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न करत असताना विमान कोसळले. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, सध्या विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात असून प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत काही जण सुदैवाने बचावले आहेत.