अॅन्जेला मर्केल यांच्या हत्येचा प्रयत्न उधळला
By Admin | Updated: August 27, 2016 04:27 IST2016-08-27T04:27:23+5:302016-08-27T04:27:23+5:30
जर्मन चॅन्सलर अॅन्जेला मर्केल यांच्या हत्येचा कथित प्रयत्न झेक पोलिसांनी एका शस्त्रधारी व्यक्तीला अटक करून उधळून लावला.

अॅन्जेला मर्केल यांच्या हत्येचा प्रयत्न उधळला
प्राग : जर्मन चॅन्सलर अॅन्जेला मर्केल यांच्या हत्येचा कथित प्रयत्न झेक पोलिसांनी एका शस्त्रधारी व्यक्तीला अटक करून उधळून लावला. मर्केल यांच्या येथील दौऱ्यात संशयिताने त्यांच्या वाहनताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता.
या आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे पोलीस प्रवक्ते जोसेफ बोकन यांनी गुरुवारी येथे सांगितले. प्रागचे गुप्तचर या घटनेची चौकशी करीत आहेत. झेक रिपब्लिकचे पंतप्रधान बोहुस्लॉव सोबोत्का यांची भेट घेण्यासाठी मर्केल प्रागच्या दौऱ्यावर आल्या होत्या. मर्केल विमानतळावरून शहराकडे येत असताना एक संशयित काळी मर्सिडीज कार त्यांच्या वाहनांच्या ताफ्यात शिरली. पोलिसांनी या कारला बाजूला होण्याच्या सूचना केल्या; मात्र चालकाने ऐकले नाही. पोलिसांनी गोळी मारण्याचा इशारा दिल्यानंतरच तो थांबला आणि कारमधून बाहेर आला. गेल्या १२ महिन्यांपासून हल्ल्यांचे सत्र असल्याने युरोपमध्ये सतर्कता बाळगण्यात येत असताना ही घटना घडली. इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी संघटनेने फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियम येथे हल्ले करून शेकडो लोकांचे प्राण घेतले आहेत. (वृत्तसंस्था)