Pakistan Asthi Kalash:पाकिस्तानातून ४०० हिंदूंच्या अस्थी भारतात आल्या आहेत. या अस्थिकलशांचे हरिद्वार येथील गंगेत विसर्जन केले जाणार आहे. २२ फेब्रुवारीला सीता घाटावर अस्थिकलशाच्या विसर्जनाच्या वेळी १०० लीटर दूधही अर्पण करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे अस्थिकलश पाकिस्तानातील कराची येथील जुन्या गोलीमार भागातील स्मशानभूमीत ८ वर्षे कलशात ठेवण्यात आले होते. महाकुंभ योगासाठी व्हिसा मिळाल्यानंतर हरिद्वारमध्ये विसर्जनाचा मार्ग मोकळा झाला.
पाकिस्तानमधील कराचीच्या जुन्या गोलीमार भागातील हिंदू स्मशानभूमीत वर्षानुवर्षे कलशात ठेवलेल्या ४०० हिंदू मृतांच्या अस्थी सोमवारी अमृतसरमधील वाघा-अटारी सीमेवरून भारतात पोहोचल्या. या अस्थी सुमारे ८ वर्षे स्मशानभूमीत ठेवण्यात आल्या होत्या. या संपूर्ण प्रक्रियेत श्री पंचमुखी हनुमान मंदिर समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाकुंभमेळा सुरु असताना या अस्थिकलशांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने व्हिसा जारी केला आहे. भारतात येण्यापूर्वी रकराची येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. मृतांच्या नातेवाईकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कुटुंबीयांनी अस्थींना विधीवत निरोप दिला. पाकिस्तानातून हिंदुस्थानात अस्थिकलश पाठवण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी यावेळी ही संख्या सर्वाधिक आहे.
कराचीच्या श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत रामनाथ मिश्रा महाराज यांनी सांगितले की, "पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू समाजातील बहुतेक लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अस्थी भारतात गंगेत विसर्जित कराव्यात अशी इच्छा आहे. त्यासाठी अस्थी कलशात गोळा केल्या जातात. त्या मंदिर आणि स्मशानभूमीत ठेवल्या जातात. जेव्हा पुरेशा प्रमाणात कलश गोळा होतात तेव्हा त्या भारताचा नेण्यासाठी व्हिसा मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारकडून व्हिसा मिळाल्यानंतर ते अस्थिकलश भारतात आणले जातात आणि गंगेत विसर्जित करण्यात येतात."
यावेळी त्यांनी ४०० कलश आणल्याचे रामनाथ मिश्र महाराज यांनी सांगितले. पाकिस्तानच्या विविध भागातून हे अस्थिकलश गोळा करण्यात आले आहेत. हे अस्थिकलश २१ फेब्रुवारीपर्यंत दिल्लीतील निगम बोध घाटावर ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर २२ फेब्रुवारीला विसर्जन करण्यात येणार आहे. याआधीही पाकिस्तानातून अस्थिकलश भारतात आणण्यात आले होते. २०११ मध्ये १३५ आणि २०१६ मध्ये १६० अस्थिकलश हरिद्वारला आणून विसर्जित करण्यात आले होते.
भारत सरकारने पाकिस्तानातील हिंदू कुटुंबांना १० दिवसांचा व्हिसा दिला आहे, जेणेकरून ते अस्थिकलश गंगेत विसर्जित करू शकतील. सध्याच्या नियमानुसार, भारत केवळ अशा कुटुंबांनाच अस्थी विसर्जनासाठी व्हिसा देत आहे ज्यांचे नातेवाईक भारतात राहतात. मात्र, आता पाकिस्तानातील हिंदूंसाठी नियम बदलले जात आहेत. व्हिसा देण्याच्या भारत सरकारच्या या निर्णयाचे पाकिस्तानमधील हिंदुत्ववाद्यांनी स्वागत केले आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या नोंदणी प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, सध्या २२ लाखांहून अधिक हिंदू पाकिस्तानमध्ये राहतात. हे प्रमाण पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या १.१८ टक्के आहे. सिंध प्रांतात ९५ टक्के हिंदू राहतात. त्यामुळे आणण्यात आलेले बहुतांश अस्थिकलश सिंध प्रातांतील आहेत.