शिकागो मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू धावत होते. व्यावसायिक धावपटू घड्याळ्याच्या काट्यावर पळत होते. हौशी धावपटू आपला दमसास तपासत स्वतःचीच परीक्षा घेत होते. तेव्हा त्या हजारोंच्या गर्दीत कर्टिस हारग्रोव्ह नावाचा धावपटूही होता. त्याने काही ही मॅरेथॉन जिंकली नाही; पण तो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मॅरेथॉनच्या जगात धावपटूंमध्ये कर्टिसचीच चर्चा होती. याचं कारण कर्टिस ही मॅरेथॉन शूज घालून नाही, तर ३ इंच उंचीची हाय हिल घालून धावत होता.
कर्टिस हारग्रोव्ह कॅनडा येथील अल्बर्टामध्ये राहणारा. शिकागो मॅरेथॉन ही कर्टिसच्या आयुष्यातील ३१०वी मॅरेथॉन होती. प्रत्येक मॅरेथॉन विशिष्ट उद्देशाने धावणे, त्यातून सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करणे, महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे हे कर्टिसच्या मॅरेथॉनमध्ये धावण्याचं वैशिष्ट्य.
महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी, या अत्याचारग्रस्त महिला आणि मुलांना सामाजिक मदत मिळवून देणाऱ्या संस्थांना निधी उभारून मदत करण्यासाठी शिकागो मॅरेथॉन ही हाय हिल्सवर धावण्याचं कर्टिसने फार पूर्वीच ठरवलं होतं. हाय हिल्स घालून शिकागो मॅरेथॉनचं ४२ कि.मी.चं अंतर वेगाने गाठण्याचं, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचं कर्टिसचं स्वप्नंही होतं.
यापूर्वी त्याने शिकागो मॅरेथॉनमध्ये हाय हिल्स घालून दोनदा आपलं लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला; पण पहिल्या प्रयत्नात ८ किलोमीटर अंतर धावल्यानंतर कर्टिसच्या शूजची हिल्स तुटली आणि त्याला स्पर्धा सोडून द्यावी लागली. नंतरच्या प्रयत्नात कर्टिस हाय हिल्स घालून ३३ कि.मी. पर्यंत धावला; पण नंतर पुन्हा हिल्स मोडल्याने त्याला स्पर्धा सोडून द्यावी लागली. यानंतरची शिकागो मॅरेथॉन हाय हिल्स घालून पूर्ण करायचीच या निर्धाराने कर्टिस प्रयत्न करू लागला. धावताना मोडून पडणाऱ्या हिल्सवर त्याने मित्रांच्या मदतीने उपाय शोधला. हिल्स तुटू नयेत म्हणून त्याने ते बुटांना वेल्डिंग करून घेतले.
या मॅरेथॉनसाठी कर्टिसला विशेष किंवा वेगळी तयारी करावी लागली नाही. प्रश्न मानसिक क्षमतेचा होता; पण शारीरिक क्षमतेसोबतच आपल्या मनाच्या ताकदीचाही त्याला पूर्ण अंदाज होता आणि विश्वासही. सन २०२४ ची शिकागो मॅरेथॉन सुरू झाली. कर्टिस पायांत लाल रंगाचे ३ इंचांचे हाय हिल्स घालून उतरला. पहिले पाच कि.मी. त्याने २७मिनिटांत, १० कि.मी. ५८ मिनिटांत पूर्ण केले; पण २५ कि.मी. नंतर हाय हिल्सच्या कडा घोट्यांना घासून घोटे दुखू लागले. पायांत गोळे येऊ लागले. हाय हिल्सचे फॅब्रिक त्याच्या अंगठ्यामधे घुसून टोचू लागले. यानंतरचं प्रत्येक पाऊल टाकणं कर्टिससाठी मोठं आव्हान होतं. एका टप्प्यावर जखमी झालेल्या त्याच्या पायांनी असहकार पुकारला. तळव्यांना फोड आले होते; पण त्याला मॅरेथॉन अर्ध्यावर सोडायची नव्हती. त्याने पायांना पट्ट्या बांधल्या आणि हाय हिल्समध्ये पाय कोंबून तो पुन्हा धावू लागला.
रक्ताळलेल्या पावलांनी कर्टिस धावत राहिला. सात तासांत त्याने ४२ कि.मी. पूर्ण केले. पावलांची त्वचा सोलवटून निघाली होती. पावलं फोड आणि जखमांनी भरली होती; पण आपल्या जखमा घरगुती हिंसाचार सोसणाऱ्या महिला आणि मुलांच्या वेदनांइतक्या वेदनादायी नव्हत्या, असंच कर्टिस सांगत राहिला.