दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांनी नेपाळमध्ये संयुक्त कारवाई करत देशातील सर्वात मोठा बेकायदेशीर शस्त्र पुरवठादार शेख सलीम उर्फ सलीम पिस्तूल याला अटक केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलीम पिस्तूल पाकिस्तानमधून भारतात बेकायदेशीर शस्त्रास्त्रे पुरवत होता. सुरक्षा यंत्रणांच्या तपासात सलीमचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि दाऊद इब्राहिमची डी कंपनी यांच्याशी थेट संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
सलीमच्या अटकेमुळे देशातील अवैध शस्त्र पुरवठा नेटवर्कविरोधात मोठे यश मिळाले असून, ही कारवाई सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठी कामगिरी मानली जात आहे. आता तपास यंत्रणा सलीमचे पाकिस्तानमधील कनेक्शन आणि त्याच्या नेटवर्कचा अधिक तपशीलवार छडा घेत आहेत.
सलीम पिस्तूलने लॉरेन्स बिश्नोई, हाशिम बाबा यांसारख्या कुख्यात गुंडांना पाकिस्तानमधून शस्त्रे पुरवली होती. तसेच, सिद्धू मूसेवाला हत्याकांडातही त्याचे नाव समोर आले आहे. २०१८ मध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती, मात्र तो नंतर परदेशात फरार झाला. त्यानंतर नेपाळमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेल आणि सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली.
बाबा सिद्दीकी हत्याकांडातही सलीमचे नाव आले आहे. तो दिल्लीच्या सीलमपूर भागातील रहिवासी असून त्याचे नेटवर्क भारत आणि पाकिस्तानमध्ये पसरलेले आहे. आर्थिक अडचणीमुळे सलीमने आठवी इयत्तेनंतर शिक्षण थांबवले. २००० साली त्याने मुकेश गुप्ता उर्फ काका याच्यासोबत मिळून वाहने चोरी करण्यास सुरुवात केली होती. ७ एप्रिल २००० रोजी त्यांनी चांदणी चौकातून एक मारुती व्हॅन चोरी केली होती आणि २५ मे २००० रोजी सलीमला अटक करण्यात आली होती. ७ ऑगस्ट २०११ रोजी त्याने जाफराबादमधील एका घरात बंदुकीचा धाक दाखवून २० लाख रुपये लुटले. त्यानंतर १८ सप्टेंबर २०१३ रोजी त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.