अचानक तुमच्या मोबाइलची रिंग वाजते आणि स्क्रीनवर एक भीषण प्रश्न झळकतो- ‘तुम्ही मरण पावला आहात का?’ (Are you dead?) - हे ऐकायला अतिशय धक्कादायक वाटू शकतं, पण चीनमध्ये हे सामान्य झालं आहे. तिथे एक नवं ॲप व्हायरल होतंय, जे तुम्ही जिवंत आहात का, हा प्रश्न तुम्हाला सातत्यानं विचारतं!.. आश्चर्य म्हणजे लाखो लोक हे ॲप डाऊनलोड करत आहेत.
या ॲपचं नाव ‘सायलेम’ (Sileme) आहे. सध्या हे ॲप केवळ चीनमध्येच नाही, तर संपूर्ण जगात प्रचंड चर्चेचा विषय ठरलं आहे आणि ते पेड डाउनलोड्सच्या यादीत टॉपवर आहे. हे तंत्रज्ञान शहरी एकटेपणाच्या त्या कटू वास्तवावर प्रकाश टाकतं, जिथे लोक गर्दीत असूनही एकटे असतात आणि स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत असतात.
‘सायलेम’ ॲप आपल्या यूझरला दर ४८ तासांनी एक नोटिफिकेशन पाठवतं. यूझरनं फक्त एक बटण दाबून आपण सुरक्षित आणि जिवंत आहोत याची खात्री द्यायची असते.
हे डिजिटल ‘हजेरी’सारखं आहे. जर एखाद्या यूझरनं सलग दोनवेळा चेक-इन चुकवलं किंवा नोटिफिकेशनला उत्तर दिलं नाही, तर या व्यक्तीबाबत काहीतरी ‘गडबड’ आहे, तो आजारी आहे किंवा मृत झाला आहे असं हे ॲप गृहीत धरतं.
त्यानंतर हे ॲप यूझरनं निवडलेल्या ‘इमर्जन्सी कॉन्टॅक्ट’ला (उदाहरणार्थ आई-वडील, नातेवाईक किंवा मित्र) स्वत:हूनच एक अलर्ट मेसेज पाठवतं. हा मेसेज प्राथमिक इशारा म्हणून काम करतो, की यूझर बहुदा काहीतरी अडचणीत आहे! त्यामुळे त्या व्यक्तीचे आप्त त्याची चौकशी करू शकतात किंवा त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात.
‘तुम्ही जिवंत आहात का?’ असं दर दोन दिवसांनी विचारणं म्हणजे तसं भीषण, भीतीदायक आणि ‘वास्तवाची’ गडद अनुभुती देणारं, पण हेच ॲप एकट्या राहणाऱ्या लोकांसाठी, ज्यांची मुलं परदेशात किंवा त्यांच्यापासून दूर आहेत त्यांच्यासाठी उपयोगीही सिद्ध होतं आहे. वृद्ध लोक हे ॲप जास्त प्रमाणात वापरत असले तरीही जे तरुण, मध्यमवयीन लोक आपलं कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळींपासून दूर राहून दीर्घकाळ एकटेच एखाद्या परक्या ठिकाणी काम करताहेत, तेदेखील या ॲपचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करत आहेत.
बीजिंगमधील ३८ वर्षीय रहिवासी विल्सन होउ एकटे राहत असल्यामुळे आणि तासन्तास काम करत असल्यामुळे त्यांनी हे ॲप त्वरित डाऊनलोड केलं. ते म्हणतात, ज्या ठिकाणी आणि भाड्याच्या ज्या घरात मी एकटाच राहतो, त्या ठिकाणी मला जर काही मोठी दुखापत झाली किंवा मी गंभीर आजारी पडलो, तर कदाचित अनेक दिवस कोणाला काही कळणारही नाही. मानसिक शांततेसाठी त्यांनी आपल्या आईला इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं आहे.
या ॲपची किंमत फक्त आठ युआन (सुमारे १०४ रुपये) आहे. मुख्य म्हणजे हे ॲप तीन तरुणांनी तयार केलं आहे. त्यांचा हा छोटासा प्रयत्न आता मोठ्या व्यवसायात बदलतो आहे. अलीकडच्या काळात चीनमधलं हे सर्वाधिक डाऊनलोड केलं जाणारं पेड ॲप बनलं आहे. हा ट्रेंड अशावेळी समोर आला आहे, जेव्हा चीनमध्ये ‘वन-पर्सन होम्स’ म्हणजेच एक व्यक्ती असलेल्या घरांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. २०३०पर्यंत चीनमध्ये अशा घरांची संख्या २० कोटींपर्यंत पोहोचू शकते.
Web Summary : A Chinese app, Sileme, gaining popularity, prompts users to confirm they're alive. It alerts emergency contacts if no response is received, addressing concerns of urban loneliness and isolation, especially among those living alone. The app is becoming a hit in China.
Web Summary : चीन में 'सायलेम' ऐप लोकप्रिय हो रहा है, जो उपयोगकर्ताओं से जीवित होने की पुष्टि करने के लिए कहता है। प्रतिक्रिया न मिलने पर यह आपातकालीन संपर्कों को सूचित करता है, जो शहरी अकेलेपन और अलगाव की चिंताओं को दूर करता है, खासकर अकेले रहने वालों के बीच। ऐप चीन में हिट हो रहा है।