१० लाख दाम्पत्यांचे दुस-या मुलासाठी अर्ज
By Admin | Updated: January 13, 2015 00:19 IST2015-01-13T00:19:22+5:302015-01-13T00:19:22+5:30
चीनमध्ये गेल्या दहा वर्षांपासून असणारे एक कुटुंब एक मूल धोरण शिथिल झाल्यानंतर, चिनी नागरिकांच्या आशा पालवल्या असून दहा लाख लोकांनी दुसरे मूल होण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला
१० लाख दाम्पत्यांचे दुस-या मुलासाठी अर्ज
बीजिंग : चीनमध्ये गेल्या दहा वर्षांपासून असणारे एक कुटुंब एक मूल धोरण शिथिल झाल्यानंतर, चिनी नागरिकांच्या आशा पालवल्या असून दहा लाख लोकांनी दुसरे मूल होण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला आहे, असे चीनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
चीन सरकारने २०१३ च्या अखेरच्या टप्प्यात एक मूल धोरण शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दहा लाख लोकांनी दुसरे मूल होण्याची परवानगी मागितली आहे. ती सरकारच्या अपेक्षेशी सुसंगत आहे, असे राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब नियोजन आयोगाच्या प्रवक्त्या माओ कुनान यांनी सांगितले. ही परवानगी दिल्यानंतर दरवर्षी जादा २० लाख मुले जन्माला येतील असे माओ म्हणाले. एक मूल धोरण शिथिल झाल्यानंतर या वर्षापासून अतिरक्त मुले जन्माला येतील.
चीनची महाकाय लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी १९७९ साली चीनमध्ये एक मूल धोरण लागू करण्यात आले होते. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली; पण त्यामुळे सामाजिक रचनेत फरक पडण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दशकात समाजातील तरुण व वृद्धांची टक्केवारी बदलू लागली. त्यामुळे हे धोरण शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे समाजात काय बदल होतील याचा अभ्यास आरोग्य अधिकारी करत आहेत. गर्भवती महिला व लहान मुले यांना आरोग्य सुविधा कशा देता येतील यावरही विचार चालू आहे. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्टँडिंग कमिटीने एक मूल धोरण शिथिल करण्यास संमती दिली आहे. त्यानंतर ज्या दाम्पत्यांना दुसरे मूल हवे आहे त्यांना अर्ज करण्याची परवानगी आहे. पती व पत्नी या दोघांपैकी एकजण त्यांच्या पालकांचे एकच मूल असेल तरच ही परवानगी दिली जाईल असे धोरण आहे.
चीनमध्ये एक मूल असणारी १५० दशलक्ष दाम्पत्ये असून, त्यापैकी ७० टक्के लोकांना दुसरे मूल होण्याची परवानगी दिल्यास देशात ९० दशलक्ष जास्त मुले जन्माला येतील. सध्या चीनमधील दाम्पत्यावर असणारा सरकारच्या धोरणाचा पगडा कमी होत आहे. (वृत्तसंस्था)