पाकिस्तानमध्ये अजून एका भारतीय नागरिकाला अटक

By Admin | Updated: May 21, 2017 17:13 IST2017-05-21T16:12:56+5:302017-05-21T17:13:45+5:30

कुलभूषण जाधव यांना संशयास्पदरित्या अटक करून फाशीची शिक्षा सुनावल्याचे प्रकरण ताजे असतानाच पाकिस्तानने अजून एका भारतीय नागरिकावर अटकेची

Another Indian citizen arrested in Pakistan | पाकिस्तानमध्ये अजून एका भारतीय नागरिकाला अटक

पाकिस्तानमध्ये अजून एका भारतीय नागरिकाला अटक

 ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 21 - कुलभूषण जाधव यांना संशयास्पदरित्या अटक करून फाशीची शिक्षा सुनावल्याचे प्रकरण ताजे असतानाच पाकिस्तानने अजून एका भारतीय नागरिकावर अटकेची कारवाई केली आहे. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी अपुऱ्या कागदपत्रांसह देशात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली एका भारतीय नागरिकाला इस्लामाबाद येथून अटक केली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या भारतीय नागरिकावर परदेशी नागरिक कायदा कलम 14 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. 

या भारतीय नागरिकाला इस्लामाबादमधील एफ-8 भागातून अटक करण्यात आली आहे. समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्याजवळ पाकिस्तानमध्ये प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.  कुलभूषण जाधव यांना झालेली अटक आणि त्यानंतर त्यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा यामुळे दोन्ही देशांतील वातावरण याआधीच तापलेले आहे. त्यामुळे अजून एका भारतीय नागरिकाला पाकिस्तानात अटक झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. 

 हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली होती. भारताने केलेल्या याचिकेवर नेदरलँड्समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गेल्या गुरुवारी आपला निकाल सुनावला. अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे पाकिस्तानला चांगलाच दणका बसला होता.

 

Web Title: Another Indian citizen arrested in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.