वॉशिंग्टन - भारतीय विद्यार्थ्याला न्यूजर्सीमध्ये जमिनीवर आपटून मारहाण केल्याच्या प्रकरणात अमेरिकी दुतावासाने स्पष्टीकरण दिले असून, अमेरिकेत अवैध प्रवेश सहन करणार नाही, असे म्हटले आहे.
अमेरिकी दुतावासाने एक्सवर म्हटले आहे की, अमेरिका आपल्या देशात वैध प्रवाशांचे स्वागत करते. आम्ही अवैध एंट्री, व्हिसाचा दुरूपयोग किंवा अमेरिकी कायद्याचे उल्लंघन सहन करणार नाही. तत्पूर्वी, मूळ भारतीय असलेले अमेरिकी व्यावसायिक कुणाल जैन यांनी रविवारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यात एका भारतीय विद्यार्थ्याला विमानतळाच्या जमिनीवर आपटून हातकडी घालण्यात आली व गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देण्यात आली. तो विद्यार्थी हरयाणवीमध्ये मी पागल नाही. हे लोक मला पागल सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे म्हणत होता. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला परत पाठवण्यात आले. (वृत्तसंस्था)
भारतीय दूतावास संपर्कातन्यूयॉर्कमध्ये भारतीय वाणिज्य दुतावासाने म्हटले की, याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर आहोत.
अपमानावर सरकारचे मौनकाँग्रेसने म्हटले की, अमेरिकेत भारतीय नागरिकांना सतत अपमानित केले जात आहे. दररोज अशा बातम्या येताहेत आणि सरकारने मौन बाळगले आहे. हे सरकार भारतीयांच्या सन्मानाचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे.