बीजिंग - चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या विकासासाठी परस्पर विश्वास आणि सहकार्य आवश्यक आहे. संघर्ष केवळ दोन्ही देशांच्याच नव्हे तर संपूर्ण आशियाच्या विकासात अडथळा आणेल. विशेषतः ब्रिक्समध्ये चीन आणि भारताने एकत्र काम करण्याची गरज आहे असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय मध्य पूर्वेत अमेरिका इस्रायलने इराणवरील हल्ले थांबवावेत अशी मागणी त्यांनी केली.
बीजिंग येथे १४ व्या नॅशनल पीपुल्स काँग्रेसच्या कार्यक्रमात वांग यांनी चीन आणि भारत यांच्यातील संबंधावर भाष्य केले. ते म्हणाले की, काझानमध्ये चीन-भारत संबंधांची नवी सुरुवात झाली आणि गेल्या ऑगस्टमध्ये तियानजिनमध्ये यात सुधारणा झाली. भारत- चीन हे जवळचे शेजारी आणि ग्लोबल साऊथचा महत्त्वाचा भाग आहेत, ज्यांचे सांस्कृतिक संबंध आणि सामायिक हितसंबंध खोलवर आहेत. त्यामुळे आम्ही सहकार्य आणखी वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत असं त्यांनी सांगितले.
ब्रिक्स मजबूत करण्याची गरज
तसेच चीन आणि भारताने चांगले शेजारी म्हणून मैत्री टिकवून ठेवावी आणि विकासावर लक्ष केंद्रित करावे. दोन्ही देशांनी एकमेकांना पाठिंबा देऊन BRICS समूह मजबूत करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः पुढील दोन वर्षांत ब्रिक्स अध्यक्षपदासाठी भारत आणि चीनने एकमेकांना पाठिंबा द्यावा. एकत्रितपणे आपण ग्लोबल साऊथमध्ये नवीन आशा आणू शकतो असा विश्वासही चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सुरुवातीला ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होता. अलीकडेच इराण, युएई, इथिओपिया आणि इजिप्तसारखे नवीन देश या गटात सामील झाले आहेत. ब्रिक्स समूह हा अमेरिकेसाठी नेहमीच एक काटा ठरला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा ब्रिक्सच्या धोरणावर टीका केली आहे. विशेषतः चीन आणि रशियाने ब्रिक्सला बळकटी देण्यावर सातत्याने भर दिला आहे. त्यामुळे आता चीनने भारतासाठी केलेला मैत्रीचा हात अमेरिकेच्या डोळ्यात खुपणारा आहे.
इराणमध्ये युद्धबंदीची मागणी
इराणमध्ये सुरू असलेल्या सैन्य कारवाईवरून हे युद्ध व्हायला नको होते. ही लढाई थांबावी आणि युद्ध संपावे याकडे चीनचे लक्ष आहे. हे युद्ध कुणाच्याही फायद्याचे नाही. युद्ध विनाशाचे शस्त्र आहे हे लक्षात ठेवावे असं सांगत चीनने इराणवरील हल्ले थांबून युद्धबंदी करावी अशी मागणी केली आहे. या महिन्याच्या शेवटी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प बीजिंग दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांची चर्चा होईल. या दोन्ही देशातील मतभेद दूर करण्यावर चीनचा भर आहे.
Web Summary : China seeks mutual trust, cooperation with India for growth, especially within BRICS. China urges halting attacks in Middle East, advocating for peace. China emphasized strengthening the BRICS group and showed support for India's upcoming leadership.
Web Summary : चीन ने भारत के साथ आपसी विश्वास और सहयोग की आवश्यकता पर जोर दिया, खासकर ब्रिक्स में। चीन ने मध्य पूर्व में हमलों को रोकने और शांति की वकालत की। चीन ने ब्रिक्स समूह को मजबूत करने पर जोर दिया और भारत के आगामी नेतृत्व के लिए समर्थन दिखाया।