अमेरिकन खासदार म्हणतात, योगा पँटवर बंदी टाका
By Admin | Updated: February 13, 2015 14:09 IST2015-02-13T14:02:24+5:302015-02-13T14:09:22+5:30
अमेरिकेतील मोंटाना येथील खासदार डेव्हिड मूर यांनी योगा पँटवर बंदी टाकणारे विधेयक मांडले असून योगा पँटसारख्या कपड्यांमधून स्त्री देहाचे ओंगळवाणे दर्शन घडते असा आक्षेप या महाशयांनी घेतला आहे.

अमेरिकन खासदार म्हणतात, योगा पँटवर बंदी टाका
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १३ - पुरोगामी विचारसरणीचे जगभरात दाखले देेणा-या अमेरिकेत आता योगा पँट बंदी टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. अमेरिकेतील मोंटाना येथील खासदार डेव्हिड मूर यांनी योगा पँटवर बंदी टाकणारे विधेयक मांडले असून योगा पँटसारख्या कपड्यांमधून स्त्री देहाचे ओंगळवाणे दर्शन घडते असा आक्षेप या महाशयांनी घेतला आहे.
अमेरिकेतील मोंटाना येथील खासदार डेव्हिड मूर हे गेल्या वर्षी त्यांच्या मतदारसंघात फिरत असताना नग्नावस्थेत सायकल चालवणारा एक ग्रूप त्यांनी बघितला. हा प्रकार बघून मूर ऐवढे संतापले आहेत की त्यांनी आता थेट कपड्यांवरही निर्बंध टाका अशी वादग्रस्त मागणी केली आहे. त्यांनी अमेरिकेतील संसदेत विधेयक सादर करत स्त्री अथवा पुरुषांच्या देहाचे प्रदर्शन घडवणा-या कपड्यांवर बंदी टाकण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्षात मूर यांनी ज्या लोकांना नग्नावस्थेत सायकल चालवताना बघितले होते ते सर्व डेअर टू बेअर राईड या मोहीमेत सामील झाले होते. पण नग्नतेवर आक्षेप घेण्याऐवजी त्यांनी थेट कपड्यांवरही आक्षेप घेतल्याने अमेरिकेतील महिला संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अमेरिकेतील योगा पँटचा उद्योग सुमारे ३० बिलियन डॉलर्सच्या (१८०० कोटी रुपये) घरात आहे. त्यामुळे ऐवढा मोठ्या उद्योग क्षेत्रावर बंदी टाकणे अमेरिकेला आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मूर नाहक महिलांना टार्गेट करत आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्या मतदारसंघातील एका महिलेने दिली.
योगा पँटवर बंदी हे एक निमित्त असून प्रत्यक्षात मूर यांना योगावरच बंदी आणायची आहे. अमेरिकेत योगा कमालीचे लोकप्रिय होत असून मूर हे योगाच्या विरोधात आहे अशी चर्चा अमेरिकेत रंगली आहे.