जगाला हादरवून सोडणाऱ्या 'ऑपरेशन एब्सोल्यूट रिझॉल्व्ह' नंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन डेल्टा फोर्सचे कमांडो घेऊन न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. शनिवारी दुपारी त्यांचे विमान न्यूयॉर्कमध्ये उतरताच एफबीआय एजंट्सनी विमानाला वेढा घातला आणि मादुरो व त्यांच्या पत्नीला कडक बंदोबस्तात ताब्यात घेतले. आता मादुरो यांना अमेरिकेच्या 'नार्को-टेररिझम' आरोपांखाली फेडरल कोर्टाचा सामना करावा लागणार आहे.
कुठे ठेवले आहे मादुरो यांना?
निकोलस मादुरो यांना ब्रुकलिनमधील अत्यंत कुख्यात मानल्या जाणाऱ्या 'मेट्रोपॉलिटन करेक्शनल सेंटर' या फेडरल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मादुरो यांना न्यूयॉर्कमध्ये आणल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच तुरुंगाबाहेर मोठी गर्दी झाली होती. यामध्ये अनेक व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी आनंद व्यक्त करत देशाचे झेंडे फडकवले आणि मादुरो यांच्या अटकेचे स्वागत केले.
ट्रम्प यांचा मोठा दावा: "आता व्हेनेझुएला आम्ही चालवणार"
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेनंतर अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. ट्रम्प म्हणाले की, "जोपर्यंत व्हेनेझुएलामध्ये लोकशाही मार्गाने आणि सुरक्षितपणे सत्तांतर होत नाही, तोपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलाचा कारभार चालवेल. आम्ही त्या देशात सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहोत." अमेरिकेच्या या भूमिकेमुळे वेनेझुएलावर आता पूर्णपणे अमेरिकेचे वर्चस्व निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढील पाऊल काय?
मादुरो यांना सोमवारी प्राथमिक सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. मादुरो आणि त्यांच्या पत्नीवर ड्रग्ज तस्करी, शस्त्रास्त्रांचा बेकायदेशीर व्यापार आणि नार्को-टेररिझमचे गंभीर आरोप आहेत. अटर्नी जनरल पॅम बाँडी यांनी स्पष्ट केले आहे की, मादुरो यांना अमेरिकन न्यायव्यवस्थेच्या पूर्ण शक्तीचा सामना करावा लागेल आणि त्यांना कोणतीही सवलत मिळणार नाही.
अशी पार पडली मोहीम
टॉप अमेरिकन जनरल डॅन केन यांनी सांगितले की, या मोहिमेत १५०हून अधिक विमानांचा वापर करण्यात आला. मादुरो यांना त्यांच्या 'फुएर्ते तियूना' या लष्करी तळावरून उचलण्यात आले आणि प्रथम 'इवो जीमा' या नौदलाच्या युद्धनौकेवर नेण्यात आले. तिथून त्यांना न्यूयॉर्कला आणले गेले. या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ मादुरो यांना जिवंत पकडणे हाच होता, जो अमेरिकेने यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. आता जगाचे लक्ष सोमवारच्या सुनावणीकडे लागले आहे.
Web Summary : Venezuelan President Maduro is in US custody, facing 'narco-terrorism' charges. Trump declared US control until democracy is restored. Maduro is held in Brooklyn. His trial is imminent.
Web Summary : वेनेजुएला के राष्ट्रपति मादुरो अमेरिकी हिरासत में, 'नार्को-टेररिज्म' के आरोपों का सामना कर रहे हैं। ट्रम्प ने लोकतंत्र बहाल होने तक अमेरिकी नियंत्रण की घोषणा की। मादुरो ब्रुकलिन में कैद, मुकदमा जल्द।