अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार तथा दिग्गज अब्जाधीश इलॉन मस्क यांनी सोमवारी सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कामावर परतावे, असा इशारा दिला आहे. मस्क म्हणाले, जे सरकारी कर्मचारी या आठवड्यापासून कामावर परतणार नाहीत, त्यांना प्रशासकीय रजेवर पाठवण्यात येईल. मस्क यांच्या टीमने एक दिवस आधीच लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला आहे. यात त्यांच्याकडून गेल्या आठवड्यात केलेल्या पाच प्रमुख कामांसंदर्भात माहिती मागवण्यात आली आहे. यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे.
मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, "जे लोक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाकडे दुर्लक्ष करत कार्यालयात परतले नाहीत, त्यांना एक महिन्याहून अधिक अवधीचा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्यापासून, जे कर्मचारी कार्यालयात परतणार नाहीत, त्यांना प्रशासकीय रजेवर पाठवले जाईल."
हा आदेश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाचा एक भाग आहे. ट्रम्प प्रशासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी रद्द केली असून त्यांना कार्यालयात कामावर परतण्याचे निर्देश दिले आहेत. २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली. यात सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात रुजू होण्याच्या आदेशाचाही समावेश होता.कर्मचाऱ्यांकडून मागवली कामाची माहिती - खरे तर, ज्या ईमेलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांकडून त्यांनी गेल्या आठवड्यात कोण कोणती कामे केली, यासंदर्भात माहिती मागवली आहे. महत्वाचे म्हणजे, मस्क यांनी स्पष्ट केले आहे की, जे कर्मचारी निर्धारित वेळेत (सोमवारी रात्री 11:59 EST) याचे उत्तर देणार नाहीत, त्यांना नोकरीवरून काढून कमी करण्यात येईल.