अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा वर्धापनदीन आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये इस्रायलने ओसामाचे नाव घेतल्यानंतर, पुन्हा एकदा त्याची आठवण ताजी झाली आहे. अमेरिकेने २ मे २०११ रोजी पाकिस्तानातील अबोटाबादमधील एका घरात घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. ही घटना जगभर एक धाडसी लष्करी कारवाई म्हणून ओळखली जाते. ही कारवाई तब्बल ४० मिनिटे चालली होती आणि भारत अनेक दशकांपासून जगाला जे सांगण्याचा प्रयत्न करत होता, ते एका कारवाईने जगासमोर आले होते.
या कारवाईनंतर एक प्रश्न अनेकांच्या मनात आहे, तो म्हणजे, अमेरिकेने ओसामाला संपवल्यानंतर, त्याच्या बायका-पोरांचे काय झाले? यासंदर्भात, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे माजी प्रवक्ते फरहतुल्ला बाबर यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे.
'द झरदारी प्रेसिडेन्सी; नाऊ इट मस्ट बी टोल्ड' या पुस्तकात बाबर सांगतात, ओसामाच्या हत्येनंतर लगेचच पाकिस्तानी सैन्य घटनास्थळी पोहोचले आणि ओसामाच्या बायकांना ताब्यात घेतले. मात्र, काही वेळानंतर, सीआयएची एक टीम थेट पाकिस्तानी सैन्याच्या अबोटाबादमधील छावणीत पोहोचली. अमेरिकन एजंट्स त्या महिलांची चौकशी करत होते. या घटनेने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावरच एक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बाबर यांनी लिहिले की, "या घटनेमुळे देशाला राष्ट्रीय अपमानाचा सामना करावा लागला. एकीकडे अमेरिकेचे एजंट्स पाकिस्तानात उघडपणे काम करत होते, तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य आणि सरकार त्यांच्यासमोर झुकताना दिसत होते. ही घटना पाकिस्तानसाठी अत्यंत लाजिरवाणी होती." एवढेच नाही, तर सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे, ओसामा तेथे असल्याचे अमेरिकेला फार आधीच माहीत होते. याशिवाय, त्यांना ओसामासाठी लपण्याचे ते ठिकाण बांधणाऱ्या कंत्राटदाराची माहितीही मिळाली होती, असा दावाही बाबर यांनी केला आहे.