अमेरिका-भारत संबंध तुटण्याच्या मार्गावर आहेत, असा स्पष्ट इशारा संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला दिला आहे. त्या म्हणाल्या, जर चीनच्या वाढत्या महत्वाकांक्षांना लगाम घालाण्याची अमेरिकेची इच्छा असेल, तर त्याला भारतासोबतच्या संबंधांना प्राधान्य द्यावे लागेल.
न्यूजवीकमध्ये बुधवारी (20 ऑगस्ट 2025) प्रसिद्ध झालेल्या एका लेखात हेली यांनी म्हलटे आहे की, "आपले लक्ष्य चीन आहे, या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे अमेरिकेने दुर्लक्ष करू नये. त्याचा सामना करण्यासाठी अमेरिकेला भारताच्या रूपाने एक मित्र असायला हवा.
टॅरिफ आणि रशियन तेलावरून वाद -व्यापार वाद आणि रशियन तेलाच्या आयातीवरून अमेरिका आणि भारत यांच्यात तणाव वाढला असतानाच हेली यांचे हे विधान आले आहे. भारताने रशियन तेल खरेदी सुरूच ठेवल्याने, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% परस्पर शुल्क तर २५% अतिरिक्त शुल्क (टॅरिफ) लादले आहे. जे २७ ऑगस्टपासून लागू होईल. भारताच्या तेल खरेदीमुळे युक्रेन युद्धात रशियाला आर्थिक मदत मिळत आहे, हे हेली यांनी मान्य केले. मात्र याच वेळी, भारतासोबत शत्रूसारखा व्यवहार करणे ही एक धोरणात्मक चूक ठरेल, असा इशाराही त्यांनी ट्रम्प प्रशासनाला दिला आहे.
चीनला लगाम घालण्यात भारताची मोठी भूमिका - हेली पुढे म्हणाल्या, "आशिया खंडात चीनच्या वर्चस्वाचा सामना करण्याची ताकद असलेला एकमेव देश भारत आहे. भारताकडे चीन प्रमाणेच मॅन्यूफॅक्चरिंग पॉवर आहे. यामुळे अमेरिकेला चीनऐवजी भारताच्या माध्यमाने आपली पुरवठा साखळी मजबूत करण्यास मदत होऊ शकते. भारताचे अमेरिका आणि इस्रायल सारख्या देशांसोबत असलेले बळकट संरक्षण संबंध त्याला जगाच्या सुरक्षिततेसाठी मजबूत बनवतात. एवढेच नाही, तर आगामी काळात भारत, चीनच्या महत्वाकांक्षेला कमकुवत करेल, असेही हेली यांचे म्हणणे आहे.
ट्रम्प-मोदी यांनी चर्चा करावी - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट चर्चा करावी जेणेकरून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. जर असे झाले नाही तर चीन या दुराव्याचा फायदा घेईल, असेही हेली यांनी सुचवले आहे.