अद्भुत - प्राणदात्याला भेटण्यासाठी दरवर्षी 8000 किलोमीटर प्रवास करणारा पेंग्विन
By Admin | Updated: March 11, 2016 18:11 IST2016-03-11T17:58:36+5:302016-03-11T18:11:13+5:30
प्राध्यापक क्रेजवास्क सांगतात की, मी असं याआधी कधीही बघितलेलं नाही, कदाचित हा पेंग्विन जोआवला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानतो, कदाचित तो जोआवला पेंग्विनच समजत असेल.

अद्भुत - प्राणदात्याला भेटण्यासाठी दरवर्षी 8000 किलोमीटर प्रवास करणारा पेंग्विन
ऑनलाइन लोकमत
रिओ दी जानेरियो, दि. 11 - ब्राझिलमधल्या 71 वर्षांच्या जोआव परेरा डिसोझा या वृद्ध मच्छिमाराला 2011 मध्ये दक्षिण अमेरिकेतून आलेला एक पेंग्विन किना-याजवळ आढळला. तेलानं माखलेला हा पेंग्विन मरणाच्या मार्गावर होता. जोआव यांनी त्याला तेलातून बाहेर काढलं, त्याची शुश्रुषा केली आणि त्याला खडखडीत बरं केलं. त्याला जोआवनं डिंडिम असं नावही दिलं. ब्राझिलमध्ये वन्यजीवांविषयी कडक कायदे आहेत आणि त्यांना तुम्हाला पाळता येत नाही. त्यामुळे बरा झालेल्या डिंडिमला सोडून देणं भाग होतं. पण डिंडिम काही जोआवला सोडायला तयार नव्हता. अखेर, काही कारणानं 11 महिन्यांनी डिंडिम पुन्हा त्याच्या मूळस्थानी म्हणजे जवळपास 8000 किलोमीटर दूर निघून गेला. आश्चर्य म्हणजे हा मूका प्राणी आपल्या प्राणदात्याचे उपकार लक्षात ठेवून दरवर्षी 8000 किलोमीटरचा पल्ला पार करतो आणि जोआवला भेटायला येतो.
दुसऱ्या वर्षी जेव्हा डिंडिम आला त्यावेळी जोआवला आश्चर्यच वाटलं पण आता तो प्रघात झालाय कारण डिंडिम दरवर्षी येतो. मी माझ्या मुलाप्रमाणे डिंडिमला मानतो असं जोआव सांगतात. इंडिपेंडंटनं हे वृत्त दिलं असून ग्लोबो टिव्हीनं जोआवची मुलाखत घेतली आहे. डिंडिमला कुणी स्पर्षही करू शकत नाही. तसा कुणी प्रयत्न केला तर तो त्यांना चावतोच. पण माझ्या मात्र अंगाखांद्यावर खेळतो, माझ्याकडून भरवून घेतो आणि माझ्या लाडात येतो, जोआव सांगतात.
जीवशास्त्राचे प्राध्यापक क्रेजवास्क सांगतात की, मी असं याआधी कधीही बघितलेलं नाही, कदाचित हा पेंग्विन जोआवला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानतो, कदाचित तो जोआवला पेंग्विनच समजत असेल.