काबूल : युद्धग्रस्त अफगाणिस्तानात सुरक्षा, संरक्षण व पुनर्निर्माणातील सहकार्य बळकट होण्यासाठी भारत सर्व प्रकारची मदत करील, अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी दिली. अफगाणिस्तान बळकट, स्वतंत्र व समृद्ध होण्याची अफगाण नागरिकांची इच्छा साकारण्यासाठी ही मदत केली जाईल, असे आश्वासन स्वराज यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांना दिले. नाटो राष्ट्रांच्या आगामी परिषदेनिमित्त स्वराज यांनी करझाई यांची येथे भेट घेऊन त्यांच्याशी व्यापक चर्चा केली. काबूलच्या मध्यवस्तीत स्वराज यांच्या हस्ते ४० दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्चाच्या नव्या भारतीय दूतावास इमारतीचे उद््घाटन झाले. नेहमीच अफगाणिस्तानचा पहिला व्यूहात्मक भागीदार असल्याचे स्वराज यावेळी म्हणाल्या. (वृत्तसंस्था)
अफगाणला भारताची सर्व प्रकारची मदत - स्वराज
By admin | Updated: September 11, 2014 02:24 IST