अजबच! या शहरात आहे मरण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 18:17 IST2016-11-02T18:17:58+5:302016-11-02T18:17:58+5:30
नॉर्वेमधील लाँगेयरबेन शहरातील विचित्र आणि अजब नियमाबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही.

अजबच! या शहरात आहे मरण्यास मनाई
>ऑनलाइन लोकमत
लाँगेयरबेन, दि. 2 - प्रत्येक शहराचे काही नियम असतात. प्राणी पाळण्यास, वाहन आणण्यास मनाई असे चित्रविचित्र नियम असलेल्या शहरांबाबत तुम्ही ऐकले असेलच. पण नॉर्वेमधील लाँगेयरबेन शहरातील विचित्र आणि अजब नियमाबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. या शहरात माणसांना चक्क मरण्यास मनाई आहे.
1906 साली खाणकामासाठी वसवण्यात आलेले लाँगेयरबेन हे शहर आता पर्यटन केंद्र बनले आहे. उत्तर ध्रुवावर सुदूर वसलेले हे शहर आपल्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. कडाक्याची थंडी आणि अवघी दोन हजार लोकवस्ती असलेल्या या शहरात ध्रुवीय अस्वलांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे येथे प्रत्येकाने बंदुक बाळगणे अनिवार्य मानले जाते. ध्रुवीय प्रदेश असल्याने येथे चार महिने सूर्यही उगवत नाही. अशी खासियत असलेल्या या शहरात मरण्यास मात्र मनाई आहे.
येथे कुणी गंभीर आजारी असेल किंवा मरणपंथाला लागले असेल. तर त्याला शेवटच्या दिवसांमध्ये विमानाने किंवा जहाजातून नॉर्वेच्या अन्य भागात हलवले जाते. याचे कारण असे सांगितले जाते की या शहरातील दफनभूमी खूपच लहान असून, गेल्या 70 वर्षांपासून येथे कुणालाही दफन करण्यात आलेले नाही. तसेच अतिथंड वातावरणामुळे येथे दफन करण्यात आलेल्या मृतदेहांचे विघटन होत नाही. शास्त्रज्ञांना अशा विघटन न झालेल्या मृतदेहांमध्ये इन्फ्लुएंझाचे विषाणू आढऴल्यापासून येथे नो डेथ पॉलिसी लागू करण्यात आली आहे.