अल कायदा म्हणते पेशावर हल्ल्याने आम्हीही दुःखी
By Admin | Updated: December 22, 2014 09:51 IST2014-12-22T09:48:21+5:302014-12-22T09:51:09+5:30
तालिबानचे जुने सहकारी आणि कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाने पेशावरमधील हल्ल्याने दुःखी झाल्याचे म्हटले आहे.

अल कायदा म्हणते पेशावर हल्ल्याने आम्हीही दुःखी
ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. २२ - तालिबानचे जुने साथीदार आणि कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाने पेशावरमधील हल्ल्याने दुःखी झाल्याचे म्हटले आहे. अमेरिका आणि त्यांचे समर्थन करणा-यांविरोधात आपण बंदुक हातात घेतली असून त्याचा वापर गरीब मुसलमानांवर करु नका अशी मुक्ताफळेही अलकायदाने उधळली आहेत.
पेशावरमधील शाळेवर तालिबानी दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. यामध्ये १४९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तालिबानी दहशतवाद्यांच्या या क्रूरकृत्याविरोधात जगभरात हळहळ व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर अल कायदाच्या दक्षिण आशिया विभागाचे प्रवक्ते ओसामा महमूदने चार पानी पत्रक काढून पेशावर हल्ल्यावर दुःख व्यक्त केले आहे. पेशावर हल्ल्यामुळे आमचे ह्रदय दुःखी आणि निराश झाल्याचे महमूदने म्हटले आहे. पाकिस्तान सैन्याचे अत्याचार वाढले असून ती लोकं अमेरिकेचे गुलाम झाले आहेत यात देखील शंका नाही. पण याचा अर्थ हा नाही की आपण गरीब, मागासलेल्या मुसलमानांशी त्याचा बदला घेऊ. आपण अल्लाहचे शत्रू असलेल्या अमेरिका, त्यांचे समर्थक देश यांच्याविरोधात बंदुक हाता घेतल्या असून त्याचा वापर विरोधी राष्ट्रांच्या सुरक्षा दलावर करावा. मुसलमान महिला व लहान मुलांवर त्याचा वापर करु नका असे महमूदने म्हटले आहे.