ओटावा : कॅनडा सरकारच्या नव्या अहवालानुसार, देशातून किमान दोन खलिस्तानी अतिरेकी गटांना आर्थिक मदत मिळाली आहे. '२०२५ चे मूल्यांकन : कॅनडामध्ये मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठ्याचा धोका' या शीर्षकाच्या अहवालात कॅनडामधून आर्थिक मदत मिळवणाऱ्या खलिस्तानी अतिरेकी गटांची ओळख बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन अशी केली आहे.
दहशतवादाला केल्या जाणाऱ्या आर्थिक पुरवठ्याबाबतचा ओटावाच्या गुप्तचर संस्थेने हा नवा अहवाल जारी केला आहे.
या अहवालात असे म्हटले आहे की, कॅनडामध्ये १९८० च्या दशकाच्या मध्यापासून राजकीयदृष्ट्या प्रेरित हिंसक अतिरेकीपणाचा धोका वाढला. भारतातील पंजाबमध्ये खलिस्तान नावाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक पद्धती वापरण्याचा प्रयत्न करणाऱ्या खलिस्तानी अतिरेक्यांमुळे धोका वाढला आहे. हे घटक वांशिक किंवा वांशिक वर्चस्वापेक्षा राजकीय स्व-निर्णय किंवा प्रतिनिधित्वावर अधिक केंद्रित आहेत.
आधीचा अहवाल
२०२२ मध्ये दहशतवादी कारवायांना आर्थिक पुरवठ्याबाबच कॅनडाच्या फायनान्शियल ट्रान्ड्रॉक्शन्स अँड रिपोर्ट्स अॅनालिसिस सेंटरने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, हिजबुल्लाह ही कॅनडामधून निधी मिळवणारी दुसरी सर्वात जास्त ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असल्याचे नोंदवले गेले आहे.
अनेक संघटांना मदत
कॅनडातील गुन्हेगारी संहितेंतर्गत सूचीबद्ध आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित हिंसक कारवायांत सहभागी असलेल्या अनेक दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत मिळत असल्याचे आढळून आले आहे.
यामध्ये हमास, हिजबुल्लाह आणि खलिस्तानी हिंसक अतिरेकी गट बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन यांचा यात समावेश आहे.
या अहवालाने कॅनडामधील खलिस्तान समर्थक घटक कोणत्याही अडथळ्याशिवाय भारतविरोधी कारवाया सुरू ठेवत आहेत, या भारताच्या दाव्यांना पुष्टी मिळत आहे.