वॉशिंग्टन: जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय संशोधन, वाहतूक व्यवस्था आणि सरकारी कामांमध्येही त्याचा वापर केला जात आहे. आता अमेरिकन सरकारने गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआय-आधारित क्राईम प्रिडिक्शन सिस्टम (AI-powered crime prediction system) सुरू करण्याची घोषणा केली आहे. या प्रणालीमुळे गुन्हा घडण्यापूर्वीच संभाव्य घटनेचा अंदाज लावणे शक्य होणार आहे.
गुन्ह्यांचा अंदाज कसा लावेल एआय?
ही नवीन प्रणाली एक सविस्तर, रिअल-टाइम आणि इंटरॅक्टिव्ह क्राईम मॅप तयार करेल. यामध्ये अनेक स्रोतांकडून माहिती गोळा केली जाईल, जसे की पोलिसांचे रेकॉर्ड, स्थानिक परिषदांचे रेकॉर्ड आणि सामाजिक सेवांच्या नोंदी. या डेटाचा अभ्यास करून, एआय गुन्ह्यांची ठिकाणे, गुन्हेगारांचे नमुने (पॅटर्न्स) आणि गुन्ह्यांची पुनरावृत्ती होणारी ठिकाणे यांचे विश्लेषण करेल.
या प्रणालीमुळे छोट्या घटना गंभीर धोक्यांमध्ये बदलण्याआधीच त्यांना रोखता येईल. अमेरिकेतील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही प्रणाली गुन्हा घडण्याआधीच "गुन्हा कुठे घडण्याची सर्वात जास्त शक्यता आहे" याचा अंदाज लावू शकेल. हे तंत्रज्ञान आधुनिक डेटा ॲनालिसिस आणि इंटरॅक्टिव्ह मॅपिंगचे मिश्रण असेल.
कधी सुरू होईल हा प्रकल्प?
हा प्रकल्प अमेरिकन सरकारच्या ५०० दशलक्ष डॉलर्सच्या संशोधन आणि विकास मिशनचा एक भाग आहे. २०३० पर्यंत हा कार्यक्रम पूर्णपणे सुरू होण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला यासाठी ४ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. विद्यापीठे, व्यवसाय आणि तंत्रज्ञान भागीदार असलेल्या संशोधन संघांना एप्रिल २०२६ पर्यंत एक वर्किंग प्रोटोटाइप सादर करायचा आहे.
आधीचे 'असे'च प्रयोग आणि टीका
एआयचा वापर गुन्हे रोखण्यासाठी पहिल्यांदाच होत नाहीये. याआधी लॉस एंजेलिस आणि शिकागोमध्येही असे प्रकल्प सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना यश मिळालं, पण नंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली आणि ते प्रकल्प बंद करण्यात आले. आता सगळ्यांच्या नजरा या नवीन प्रयोगाकडे लागल्या आहेत.