अमेरिकेनंतर ब्रिटनचीही विमानात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 07:39 IST2017-03-22T05:23:16+5:302017-03-22T07:39:29+5:30
अमेरिकेनंतर आता ब्रिटननेही 6 मुस्लिम बहुल देशांतील प्रवाशांवर ब्रिटनमध्ये येताना विमानातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास बंदी

अमेरिकेनंतर ब्रिटनचीही विमानात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंदी
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 22 - अमेरिकेनंतर आता ब्रिटननेही 6 मुस्लिम बहुल देशांतील प्रवाशांवर ब्रिटनमध्ये येताना विमानातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास बंदी घातली आहे. यामध्ये टर्की, लेबेनॉन, जॉर्डन , इजिप्त, ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे. सुरक्षाकारणास्तव खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचं कारण ब्रिटनने दिलं आहे.
या नियमानुसार, लेबेनॉन, जॉर्डन , इजिप्त, ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया या देशातील प्रवाशांना विमानात लॅपटॉप, टॅबलेट,डीव्हीडी प्लेयर, आयपॅड आणि मोठ्या आकाराचे मोबाइल फोन नेता येणार नाहीत. आम्ही हवाई सुरक्षेबाबतचे निर्णय विचारपूर्वक घेतो, प्रवाशांच्या सुरक्षेसोबत तडजोड करता येणार नाही असं ब्रिटन सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. ही बंदी तात्पुरत्या स्वरूपात आहे की यामध्ये नंतर काही बदल करण्यात येणार , याबाबत ब्रिटनकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही.
यापुर्वी मंगळवारी अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनेही 10 मुस्लिम बहुल देशांतील प्रवाशांना अमेरिकेत जाताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यावर बंदी घातली . या नियमानुसार कैरो, अम्मान, कुवेत, कासाब्लँका, मोरोक्को, दोहा, रियाध, जेद्दाह, इस्तांबुल, अबुधाबी व दुबई या शहरातून अमेरिकेत जाणाऱ्या विमानातील प्रवाशांना आपल्यासोबत लॅपटॉप, आयपॅड, कॅमेरे व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेता येणार नाहीत. विमानाच्या कार्गोमधील सामानात मात्र त्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेता येतील. काही जहालमतवादी लोक प्रवासी जेट विमाने उडविण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली त्यानंतर खबरदारी म्हणून दहा देशांतून येणाऱ्या विमानांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.