पाकिस्ताचे सेनाप्रमुख आसिम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी भारताला युद्धाचा इशारा दिला होता. यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी देखील मुनीर यांची री ओढत भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. जर भारताने सिंधु जल करार स्थगित करून ठेवला आणि नदीवर बांध उभारला तर पाकिस्तान पुन्हा भारताविरुद्ध युद्ध पुकारेल, असा इशारा बिलावल भुट्टो यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या जनतेने समर्थन द्यावे, असे आवाहन देखील केले आहे.
बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तानच्या जनतेला आवाहन करताना म्हटले की, "आम्हाला पाकिस्तानच्या जनतेच्या समर्थनाची गरज आहे. आपल्याला मोदींविरोधात आवाज उठवायचा आहे, ज्यामुळे आपण हा अन्याय थांबवू शकू. आपल्या जनतेत इतकी ताकद आहे की, आपण यांचा सहज सामना करू शकतो आणि आपल्या हक्काच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून परत मिळवू शकतो."
पाकला शांतता, तर भारताला युद्ध हवे!बिलावल भुट्टो पुढे म्हणाले की, "पाकिस्तानने कधीच युद्धाची सुरुवात केली नाही. आपण नेहमीच शांतता आणि अहिंसेचे पालन केले. पाकिस्तानचे नेते जिथेही गेले, तिथे त्यांनी नेहमीच शांतीचे समर्थन केले. पण, भारताने युद्धाच्या गोष्टी केल्या. पण, जर युद्ध झाले तर आम्ही या शाह अब्दुल यांच्या भूमीवरून हे सांगू इच्छितो की, आम्ही मागे हटणार नाही, आम्ही झुकणार नाही. जर, भारताने हल्ला करायचा विचार केला तर, पाकिस्तानच्या प्रत्येक गावातील व्यक्ती याचा सामना करायला तयार आहे. यात आम्ही भारताला नक्की हरवू."
आसिम मुनीरने दिली अणु हल्ल्याची धमकीसध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पाक सेना प्रमुख आसिम मुनीर यांनी एक कार्यक्रमादरम्यान भारताला अणुयुद्धाची धमकी दिली होती. सिंधु पाणी कराराचा उल्लेख करत आसिम मुनीर म्हणाले की, आमचा देश परमाणु संपन्न आहे. जर, आम्हाला बुडवायचा प्रयत्न केला, तर आम्ही सोबत अर्धे जग घेऊन बुडू. मुनीर इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भारताला धमकी देत म्हटले की, जर भारताने सिंधुवर धरण बांधण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तो मिसाईलने उडवून टाकू."