अफगाण तालिबान दहशतवादी संघटना नाही
By Admin | Updated: January 30, 2015 00:23 IST2015-01-30T00:23:56+5:302015-01-30T00:23:56+5:30
अफगाण तालिबान ही काही दहशतवादी संघटना नव्हे, तर एक सशस्त्र बंड आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

अफगाण तालिबान दहशतवादी संघटना नाही
वॉशिंग्टन : अफगाण तालिबान ही काही दहशतवादी संघटना नव्हे, तर एक सशस्त्र बंड आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना असल्याने आम्ही दहशतवादी संघटनांना सवलत देत नाही, असे सांगत अमेरिकेने या दोन संघटनांमधील तफावत स्पष्ट केली.
व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी सचिव इरिक शल्त्झ यांना दैनंदिन पत्रकार परिषदेत पुन्हा विचारण्यात आले असता त्यांनी तालिबान दहशतवादी संघटना आहे, असे मी समजत नाही. ते एक सशस्त्र बंड आहे असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. जॉर्डन सरकारने आयएसआयएल (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड लेव्हंट) सोबत कैद्यांची अदलाबदल करण्याचा घेतलेला निर्णय, तसेच अमेरिकेनेही लष्करातील सार्जंट बोवे बर्गदहल यांच्या सुटकेसाठी तालिबानचे पाच सदस्य मुक्त करण्यासंबंधी घेतलेला निर्णय एक सारखाच नाही का? यावर इरिक शल्त्झ म्हणाले की, त्यावेळीही या मुद्यांवर चांगलाच खल झाला होता. संघर्षात्मक स्थिती संपुष्टात आल्यानंतर कैद्यांची अदलाबदली होत असते. अफगाणिस्तानातील युद्ध समाप्त होण्याच्या मार्गावर असल्याने असा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे, असे आम्हाला वाटले. कोणाही पुरुष किंवा महिलेला माघारी ठेवले जाणार नाही, या तत्त्वाशी कमांडर इन चीफ म्हणून अध्यक्षांनी बांधिलकी व्यक्त केली आहे. या तत्त्वाला धरूनच ते काम करीत आहेत, असेही इरिक शल्त्झ यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)