सर्व दहशतवाद्यांवर कारवाई हवी -केरी
By Admin | Updated: January 14, 2015 02:06 IST2015-01-14T02:06:54+5:302015-01-14T02:06:54+5:30
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी पाकला कडक शब्दांत समज दिली असून, पाकने लष्कर-ए-तोयबा, हक्कानी व तालिबान यासारख्या सर्वच दहशतवादी संघटनांवर कारवाई केली पाहिजे.

सर्व दहशतवाद्यांवर कारवाई हवी -केरी
इस्लामाबाद : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी पाकला कडक शब्दांत समज दिली असून, पाकने लष्कर-ए-तोयबा, हक्कानी व तालिबान यासारख्या सर्वच दहशतवादी संघटनांवर कारवाई केली पाहिजे. या संघटनांचा धोका पाकला स्वत:ला तर आहेच; पण त्याचबरोबर शेजारी देश असलेला भारत व अमेरिका यांच्यासाठीही दहशतवादी घातक आहेत, असे केरी म्हणाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केरी बोलत होते. हक्कानी संघटना, लष्कर-ए- तोयबा व तालिबान या संघटना पाकिस्तानसाठी धोकादायक आहेतच; पण भारत व अमेरिका यांनाही त्यांचा धोका आहे, असे केरी म्हणाले. केरी भारतातून पाकला गेले आहेत.
परिसराला सुरक्षा व शांतता लाभण्यासाठी सर्वच दहशतवादी संघटनांवर कारवाई करणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांना पाकमध्ये आश्रय मिळू नये यासाठी सर्वांनीच सतर्क राहिले पाहिजे. हे काम कठीण आहे, ते आजपर्यंत केले गेले नाही; पण आता ते प्राधान्य क्रमाने केले पाहिजे. आयएसआय हक्कानीला अफगाणमध्ये पाकचा प्रभाव वाढविण्यासाठी मदत करत आहे, असा आरोप अमेरिकी व अफगाण अधिकारी नेहमी करतात, पण पाक त्याचा इन्कार करतो. (वृत्तसंस्था)